मुंबई : यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना (Kharif Seeds) बी-बियाणांची चिंता नाही. बियाणांमध्ये वाढ व्हावी या दृष्टीकोनातून महाबीज, कृषी विभागाने प्रयत्न केले शिवाय उन्हाळी हंगामात सोयाबीनचे उत्पादन क्षेत्र वाढले होते. त्या दरम्यानही शेतकऱ्यांनी बियाणांचा प्रयोग केला होता. विशेष म्हणजे (Soybean Seed) सोयाबीन बियाणावरच शेतकरी आणि कृषी विभागाचा भर राहिलेला आहे. त्यामुळेच यंदा (Kharif Season) खरीप हंगामात राज्यासाठी 17 लाख 95 हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता असताना कृषी विभाग येथील खासगी संस्थांकडे तब्बल 19 लाख 88 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असणार आहे. सर्वांच्या प्रयत्नातून बियाणांचा प्रश्न मिटला असला तरी यंदा धास्ती आहे ती रासायनिक खताची. याबाबत राज्य सरकारने पुरवठ्याबाबत अधिकृत माहिती सांगितली नसली तरी खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 45 लाख 20 हजार मे.टन रासायनिक खत उपलब्ध होणार असून त्यापैकी 9 लाख 8 हजार लाख मे.टन पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात 16 लाख 98 हजार मे. टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे बियाणांचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी रासायनिक खतासाठी मात्र, धावपळ होणार हे निश्चित.
खरीप हंगाम करीता घरचे सोयाबीन बियाणे मोहिम राबविण्यात आली होती. राज्यामध्ये शेतकऱ्यांनी घरचे तयार केलेले 4 लाख 9 हजार क्विंटल इतके सोयाबीन बियाणे उपलब्ध झालेले आहे व याबरोबरच गतवर्षीच्या उन्हाळी हंगामात त्रुटिपूर्ती सोयाबीन बिजोत्पादन घेण्यात आलेला असुन 62 हजार 928 हे क्षेत्रावर रब्बी / उन्हाळी पेरणी करण्यात आली आहे. रब्बी/उन्हाळी सोयाबीन पिकाचे अंदाजित बियाणे उत्पादन 2 लाख 70 लाख क्विंटल होणार असून स्थानिक पातळीवर घरचे सोयाबीन बियाणे मोहीमेद्वारे एकूण 48 लाख 17 हजार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.
खरीप हंगामील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 45.20 लाख मे.टन रासायनिक खत उपलब्ध होणार असून त्यापैकी 9.08 लाख मे.टन पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात 16.98 लाख मे. टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण निविष्टा मिळण्यासाठी आणि त्यामधील नुकसान टाळण्यासाठी 395 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये खताच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे युरिया, डी.ए.पी चे दर स्थिर ठेवणेसाठी केंद्र शासनास वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने व विशेषता मंत्री कृषि यांचे प्रयत्नाने यश प्राप्त झाले असुन दर स्थिर राहणार आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याासाठी कृषी विभागाकडून विविध योजना तर राबवल्या जातातच पण ऐन हंगामात बियाणे आणि रासायनिक खतांची टंचाई भासू नये यासाठी हंगामपूर्व बैठकांचे आयोजन केले जाते. गेल्या महिनाभरापासून जिल्हा निहाय आढावा बैठका पार पडत आहे. सर्व जिल्ह्यातील आढावा घेतल्यानंतर कृषी विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली असून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सदैव प्रय़त्न केले जाणार आहे. वेळप्रसंगी चौकटी बाहेरा जाऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.