‘या’ पोरी जगात भारी; शेतीचा सगळा डोलारा सांभाळताहेत या दोघी बहिणी…

| Updated on: Feb 22, 2023 | 9:24 PM

चालकाकडून ट्रॅक्टर चालविण्याचे धडे घेत ती सातवीत असतानाच ट्रॅक्टर चालवण्यास शिकली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ती स्वतः ट्रॅक्टर चालवून घरची शेती करत असल्याने ट्रॅक्टरद्वारे शेती करते आणि चालकावर होणारा खर्च कमी केला आहे.

या पोरी जगात भारी; शेतीचा सगळा डोलारा सांभाळताहेत या दोघी बहिणी...
Follow us on

संगमनेर/अहमदनगरः मुलांपेक्षा मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नसतात हे मुलींनी वेळोवेळी दाखवून दिल आहे. घराला वारस मुलगाच असावा असा हट्ट केला जातो आणि मुलगी नकोशी म्हणून तिला गर्भातच संपवलही जातं. असं विदारक चित्र समाजात निर्माण झालेलं असतानाच संगमनेर तालुक्यात मात्र मुलींच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजापुढं एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. शेळकेवाडी येथील मुलींनी घरच्या शेतीची सर्व जबाबदारी स्वीकारत समाजापुढेही एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

आजपर्यंत पुरुष ट्रॅक्टर आणि इतर वाहने चालविताना आपण बघितल आहे मात्र वंदना ही विद्यार्थिनी याला अपवाद ठरली आहे. ग्रामीण भागातील ही युवती स्वतः ट्रॅक्टर चालवून घरच्या शेतीची नांगरणी, वखरणी, ब्लोअरद्वारे फळझाडांना फवारणी कामं करीत असते.

तिच्या या धाडसामुळे या परिसरात आता तिचे कौतूक होत आहे. खेड्यातल्या मुली सर्वसाधारणपणे घरकामात आईला मदत करतात. फारच झाल तर शेतात खुरपणी करताना दिसतात. मात्र वंदना त्याही पलीकडे जाऊन काम करते आहे.

घरात आई-वडिलांसह वंदना आणि ऋतुजा या दोघी बहिणी. वंदना थोरली आहे. वंदना ही बीफार्मसीचे शिक्षण घेते आहे तर ऋतुजा दहावीत शिकते आहे.

भाऊ नसल्याने शेतीचा तिच्यावर अर्थातच भार पडलेला. वंदनाच्या घरी ३० एकर शेती त्यापैकी 20 एकर बागायती आहे. शिक्षणासोबतच ती घरच्या शेतीची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडत असते. आज शेतात डाळिंब, कांदे, हरबरा, जनावरांसाठी चारा आदी पिके घेतली आहेत. मजुरांच्या मदतीनेही ती शेती करते.

वंदनाच्या घरी ट्रॅक्टर आहे. त्यामुळे तिला ट्रॅक्टर चालविण्याची खूप जिद्द होती. मुलीने ट्रॅक्टर चालवायचा ही न पटणारी बाब होती. मात्र आई-वडिलांनीही तिला प्रोत्साहन देत तिच्या इच्छेला बळ दिले.

चालकाकडून ट्रॅक्टर चालविण्याचे धडे घेत ती सातवीत असतानाच ट्रॅक्टर चालवण्यास शिकली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ती स्वतः ट्रॅक्टर चालवून घरची शेती करत असल्याने ट्रॅक्टरद्वारे शेती करते आणि चालकावर होणारा खर्च कमी केला आहे.

पहाटे लवकर उठून स्वतःचे आवरणे आणि त्यानंतर गायींचे दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध स्कूटीवरून डेअरीवर घालणे. घरी परतल्यावर गायींसाठी पेंड व गायींचे खाद्य घेऊन येणे. शेतातून चारा आणणे. गायींना खाऊ घालणे, शेतातील कामे करणे ही सर्व कामे करून मिळालेल्या वेळेत अभ्यास करणे असा वंदनाचा दिनक्रम आहे.

ती कॉलेजात इतकी अप टू डेट असते तिला कोणी म्हणणार नाही की ही मुलगी एवढी कष्टाची कामे करते. शिक्षण करून घराला हातभार लावत असल्याने वंदनाचा अभिमान वाटत असल्याच तिचे वडील लिंबाजी शेळके सांगतात.

आजचे शिक्षण घेणारी मुले आणि मुली शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीच्या मागे पळताना दिसतात मात्र मुळातच शेती हा विषय त्यांच्या डोक्याबाहेरचा असतो.

अभ्यासाच कारण पुढे करून आई-वडिलांना शेतीच्या कामात साधी मदतही केली जात नाही. मात्र घरात मुलगा असला की बापाच्या हातातील काम स्वतःच्या खांद्यावर घेऊन जबाबदारीच ओझ हलकं करतो या मानसिकतेतुन समजातून मुलगा झाला पाहिजे असा हट्ट धरला जातो. मात्र समाजाच्या या मानसिकतेला वंदना आणि ऋतूजाने दिलेली सनसनित चपराकच म्हणावी लागेल.