लातूर : आठ दिवसांपासून कृषी क्षेत्रात केवळ सोयाबीनच्या वाढत्या दराचीच चर्चा सुरु आहे. आज (गुरुवारी) देखील (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात वाढ कायम राहिलेली आहे. एकवेळ सोन्या-चांदीच्या दराचा शेतकऱ्यांना विसर पडेल पण सोयाबीनच्या नाही. याला कारणही तसेच आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 1 हजार रुपयांनी सोयाबीनचे दर वाढलेले आहेत. शिवाय अजून वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढत्या दरामुळे बाजारपेठेतील सर्व समीकरणे बदलली असून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक दर गुरुवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला आहे. बुधवारी 7 हजार तर अवघ्या 24 तासांमध्ये 7 हजार 300 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे दर झाले आहे. (Soybean Arrival) शिवाय 18 ते 20 हजार पोत्यांची आवक ही थेट 30 हजार पोत्यांवर गेली आहे. असे असूनही भविष्यात दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या दरात विक्री की साठणूकीचाच शेतकरी निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक कायम कमी राहिलेली होती. दिवाळी नंतर दरवाढ झाल्याने आवकमध्ये सुधारणा झाली होती. मात्र, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हंगामात 40 ते 50 हजार पोत्यांची आवक ही ठरलेलीच असते पण यंदाही एकदाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली नाही. सध्याच्या वाढत्या दरामुळे गुरुवारी तब्बल 30 हजार पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे.
अपेक्षित दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक असाच निर्णय सोयाबीन आणि कापसाबाबत शेतकऱ्यांनी घेतला होता. हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा निर्णय यशस्वी ठरत आहेत. कारण गेल्या 10 वर्षात जो दर कापसाला मिळालेला नाही तो यंदा मिळालेला आहे. कापूस सध्या 10 हजार 300 रुपयांवर स्थिरावलेला आहे तर दुसरीकडे सोयाबीनची घोडदौड ही सुरुच आहे. दहा दिवसांपूर्वी 6 हजार 200 असलेले सोयाबीन आता 7 हजार 300 वर पोहचलेले आहे.
सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. दर वाढीची अपेक्षा होती पण एवढी नाही असे शेतकरीच बोलून दाखवत आहेत. सध्या सोयाबीनचा बाजार हा तेजीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अणखीन काही दिवस वाढीव दराची वाट पहावी. मात्र, दर कमी होताच लागलीच विक्री करणे गरजेचे आहे. परदेशात सोयाबीनचे उत्पादन घटल्याने दर वाढ होत आहे आणि भविष्यातही होईल असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.
पीकविमा योजना : 6 वर्षात 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ, यंदा योजनेत काय बदल?
Rabi Season : हरभऱ्याचे क्षेत्र वाढले, आवकही वाढली दराचे काय? पीक कापणी मात्र जोमात