हिंगोली : खरिपातील (Soybean) सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात चढ-उतार राहिलेला आहे. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Soybean Rate) सोयाबीन हे स्थिरावले आहे. गेल्या काही दिवसांपासून 7 हजार 200 रुपये प्रति क्विंटल असाच दर सोयाबीनचा राहिलेला आहे. तर दुसरीकडे (Chickpea Rate) हरभरा आणि तूरीलाही हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हमीभाव केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस याच पिकाने बाजारपेठेचे लक्ष वेधले होते. कापसाला तर विक्रमी दर मिळाला होता पण सध्या कापसाची आवक ही कमी झाली असून साठवणूकीतला कापूस शेतकऱ्यांनी विकला आहे. आता खरिपातील सोयबीन, तूर तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरु आहे.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली होती. असे असताना नुकसानभरपाई म्हणून सोयाबीनसाठीच सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. शिवाय पदरी पडलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणात विक्रीही झाली आहे. त्यामुळे एकीकडे नुकसान झाले असले तरी दुसरीकेडे मिळालेली मदत आणि वाढीव दर यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. सध्या सोयाबीनची आवक ही अंतिम टप्प्यातील आहे. तर दरही सर्वसाधरण राहिलेला आहे.मात्र, शेतकऱ्यांना ज्या 10 हजार रुपये क्विंटलची अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाही.
अवकाळी पावसामुळे तुरीचे उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा होती पण गेल्या 15 दिवसांपासून तुरीच्या दरातील घसरण ही सुरुच आहे. 6 हजार 500 वर गेलेले दर थेट 6 हजार 6 हजार 100 वर येऊन ठेपले आहेत. तर दुसरीकडे नाफेडने हमी भाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये क्विंटल असा दर ठरवून दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता तुरीचा साठा करीत आहेत अन्यथा हमीभाव केंद्रावरच विक्री करीत आहेत.
यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा हे मुख्य पीक होते. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादनातही वाढ झालेली आहे. त्यामुळेच दिवसाकाठी येथील बाजार समितीमध्ये 15 ते 20 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. असे असतानाही हमीभावापेक्षा कमीचाच दर हरभऱ्याला मिळत आहे. हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल असा दर निश्चित केला आहे तर खुल्या बाजारात 4 हजार 600 प्रमाणे हरभऱ्याला दर मिळत आहे. एकंदरीत शेतीमालाची आवक आणि दर हे दोन्हीही स्थिर आहेत. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनला काय दर मिळतात ते पहावे लागणार आहे.