शेतकरी सध्या अस्मानीच नाही तर सुलतानी संकटाला सुद्धा तोंड देत आहे. लहरी हवामानाने त्याला जेरीस आणले आहे तर दुसरीकडे प्रशासकीय पांढऱ्या हत्तींनी त्याच्यासमोर संकटांची मालिका सुरू केली आहे. सोयाबीन पीकाला भाव मिळत नसल्याने नाराजी असतानाच आता बारदाना नसल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे साठवण करायला जागाच नसल्याचे कारण देत कापसाच्या खरेदीला ब्रेक लागला आहे. राज्यातील अनेक भागात असे प्रकार सुरू असल्याने दाद तरी कुणाकडे मागावी असा खडा सवाल शेतकरी विचारत आहेत.
कापसाची खरेदी CII ने केली बंद
जालना येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्राने कापसाच्या खरेदीला ब्रेक लावला आहे. कापसाची खरेदी आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. कापसाच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने सीसीआय केंद्राने कापसाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय केंद्राने) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीस पत्र दिले आहे. त्यात कापसाच्य साठवणुकीसाठी जागा नसल्याचे रडगाणे गायले आहे. पुढील आदेशापर्यंत कापसाच्या खरेदीला ब्रेक लावला आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांनी आपला पुढील आदेशापर्यंत सीसीआय येथील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणू नये असे आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं आहे.
यवतमाळात शेतकरी आक्रमक
यवतमाळात कापूस खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक झाले. रात्री यवतमाळ ते दारव्हा मार्ग काही काळ शेतकर्यांनी रोखून धरला होता. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर काही कापूस गाड्या थांबून ठेवल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. संबंधित अधिकार्यांना खरेदी केंद्रावर पाठवले. खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले.
बारदाणा नसल्याने सोयबीन शेतकरी नाराज
बुलढाणा जिल्ह्यातील हमी भाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी मागील आठवड्यापासून बारदाना अभावी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल खरेदी केंद्रावर न नेता कमी भावात बाजारात विकावा लागत आहे. परिणामी शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात नाफेड अंतर्गत जवळपास ६० खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. याठिकाणी ७० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र बारदाना नसल्याने खरेदी केंद्र बंद पडले आहे. तर शेतकरी अडकले आहेत. शासनाने तत्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.