पुणे : इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे खरं करुन दाखवलंय इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या प्रभाकर खरात यांनी. खरात यांनी सफरचंदाची शेती करून त्याचं यशस्वीरित्या उत्पादन घेतलंय. याशिवाय जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी सफरचंदाची लागवड कशी करावी याचं उत्तम मार्गदर्शन खरात कुटुंबीय करत आहेत.
प्रभाकर खरात हे मुळचे शिक्षक मात्र सेवा निवृत्त झाल्यापासून ते शेती करतात. शेती करत असताना एक वेगळा प्रयोग करायचा म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करायची ठरवली. यासाठी त्यांनी दार्जिलिंगहून सफरचंदाची रोपं मागवली होती. या रोपांची लागवड करुन अवघ्या 15 ते 19 महिन्यात त्यांनी सफरचंदाचं पहिलं उत्पादन यशस्वीपणे काढलं. यामुळे परिसरात सफरचंदाची शेती चांगलीच चर्चेत आलीय.
प्रभाकर खरात यांचा धाकटा मुलगा ही त्यांना शेतीत मदत करतो. सफरचंदाचा 10 गुठ्यांतील यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्यांनी सिडलेस लिंबू, खायचा बदाम याशिवाय मसाल्याच्या पदार्थासह एकूण 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी उत्पादने यशस्वीपणे घेतली आहे. याशिवाय ऊस उत्पादन किंवा नेहमीच्या पिकांपेक्षा सफरचंद, सिडलेस लिंबू, खायचा बदाम यातून अधिकचा नफाही त्यांना मिळतो आहे, अशी माहिती कालिदास खरात यांनी दिली.
योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केलं तर शेतीत कसा नफा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे खरात कुटुंब आहे. यशस्वी प्रयोगानंतर ते इतर शेतकऱ्यांनाही उत्तम मार्गदर्शन करत आहेत. जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त इतरही ठिकाणी सफरचंदाची शेती करता येते. याचा उत्तम प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या सणसर येथील खरात गुरुजींनी करुन दाखवलाय.
Successful Apple farming in Sansar village of Indapur Pune Know how