नाशिक : यंदा (Summer Onion)उन्हाळी कांद्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून (Onion Rate) कांद्याच्या दरात अशी काय घसरण होत आहे की बाजारपेठेत दाखल करण्यासाठी होणारा खर्चही उत्पादनातून शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. तर दुसरीकडे (Onion Harvesting) कांदा काढणीसाठी मजूरांची टंचाई भासत असल्याने कांदा पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाढते ऊन आणि शेतीकामामुळे मजूर तर मिळतच नाहीत आणि मिळाले तरी मजुरीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे कांदा वावरातून बाहेर काढणेही मुश्किल होत आहे. दरवर्षी दरातील लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो पण यंदा दुहेरी संकट ओढावल्याने कांदा पीक कसे लहरीपणाचे आहे याचा प्रत्यय शेतकऱ्यांना येऊ लागला आहे.कांदा काढणीच्या दरात गतवर्षीपेक्षा 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस कांदा उत्पादनावरील खर्च हा वाढतच आहे.बियाणे, लागवड, खते, कीटकनाशके आणि आता मजुरी यामध्येही वाढ झाली आहे. उत्पादनावरील खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न याचा ताळमेळच लागत नसल्याने या नगदी पिकाबाबत शेतकऱ्यांची भूमिका ही बदलत जात आहे. 2019 तुलनेत काढणी खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कांदा दराचा लहरीपणा हा कायम आहे. जानेवारी महिन्यात 35 रुपये किलो असलेला कांदा आता 1 रुपया किलोने विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. रोजंदारीने नाही तर गुत्ते या पध्दतीने काढणी कामे केली जात आहे. शेतकऱ्यांना पीक काढणीशिवाय पर्यायच नसल्याने अधिकचे मजुरी देऊन कांदा काढणीची कामे सुरु आहेत.
दरवर्षी कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे. असे असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढतेय हे विशेष. एक वर्ष नुकसान झाले तरी आगामी वर्षात दर मिळतील या आशेने राज्यात कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. शिवाय नाशिक, सोलापूर, मालेगाव या मुख्य बाजारपेठांच्या भागात तर विक्रमी क्षेत्रावर कांदा लागवड केली जाते. लागवडीच्या दरम्यान, दरातील चढ-उताराचा अंदाजच येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विाचर करुन कांद्याला किमान 30 रुपये किलो दर ठरविण्याची मागणी शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना ह्या करीत आहे.
कांदा हे हंगामी पीक आहे. शिवाय दराला घेऊन यातील तेजी-मंदीचा परिणाम थेट उत्पादकावर होत आहे. वाढीव दराचा कमी पण ढासळलेल्या दराने अधिकचे नुकसान हे ठरलेलेच आहे. दिवसेंदिवस उत्पादनात खर्च वाढत आहे याचा विचार करुन शासनानेही दर निश्चित करावा अशी मागणी शेतकरी गणेश शेटे यांनी केली आहे. नगदी पिकांची ही अवस्था तर इतर पिकांचे काय असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.