मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी याच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. कारण सुनील शेट्टी याने केलेलं वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागणारं ठरतंय. सुनील शेट्टी याने लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर शेती करत असल्याचं म्हटलं असलं, तरी टॉमॅटो उत्पादक शेतकरी सुनील शेट्टी याच्या वक्तव्यावर नाराज आहेत. एवढंच नाही, सोशल मीडियावर सुनील शेट्टी याच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला आहे. यात आनंदाचा शिधा याचा दाखला देखील एका युझर्सने दिला आहे. आनंदाचा शिधा हा दिवाळीला महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारकडून पुरवण्यात आला होता. आनंदाचा शिधा रेशनिंग दुकानातून जनतेपर्यंत पोहोचला होता. सुनील शेट्टी हा अर्थातच एक अभिनेता आहे, उद्योजक आहे, आणि तरीही त्याला कधी तरी वाढलेले टोमॅटोचे भाव जास्त वाटत असतील. तर तो खरा आनंदाचा शिधाचा लाभार्थी आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर आली आहे.
राज्य सरकारने मागील दिवाळीत गरीबांसाठी अवघ्या १०० रुपायात आनंदाचा शिधा म्हणजेच, त्यात १ लीटर पामतेल, १ किलो लाख, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ असं किट बनवून ते शिधापत्रिका धारकांना वाटण्यात आलं होतं. तर सुनील शेट्टी देखील या आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी आहे, अशी खरमरीत टीका सुनील शेट्टी याच्यावर होत आहे.
टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, आणि त्याचा परिणाम हा आमच्या किचनवरही होत आहे, असं सुनील शेट्टी याने म्हटल्याने शेतकरी संतापले आहेत. टोमॅटोला कधीतरी एवढा चांगला भाव मिळाला आहे, आणि टोमॅटो म्हणजे काही जीवनावश्यक वस्तू नाही. जी हवीच असते, तरी देखील सुनील शेट्टी याने अशी प्रतिक्रिया दिल्याने सुनील शेट्टी विरोधात शेतकरी समूह प्रचंड नाराज झाला आहे.
सुनील शेट्टी याने पुढे म्हटलं आहे की, आपली सौभाग्यवती आणि आपलं ताज्या फळे आणि भाज्या खाण्यावरंच जास्त जोर असतो, म्हणून आम्ही ताजा भाजीपाला आणि फळांसाठी फक्त अॅपनेच खरेदी करतो.सुनील शेट्टी याने काही दिवसांपूर्वी एक फूड अॅप लॉन्च केले होते, त्या फूड अॅपच्या प्रमोशनसाठी केलेली ही पोस्ट फसली तर नाही ना, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
अभिनेता सुनील शेट्टी आनंदाचा शिधाचा खरा लाभार्थी, असं म्हणताना सुनील शेट्टी यांची लोकांनी लाज काढली आहे. यापेक्षाही भयानक प्रतिक्रिया या सोशल मीडियावर आलेल्या आहेत. सुनील शेट्टीला कदाचित हे माहित नसावं की, १ वेळेस टोमॅटोचा भाव वाढू शकतो, पण ९९ वेळेस तो स्वस्तात जातो.त्यापेक्षाही १ रुपयाला १ किलो टॉमॅटो मार्केटमध्ये विकून येणारे देखील शेतकरी आहेत, ज्यात टॉमॅटोचा खर्चही निघत नाही.