‘नैसर्गिक शेती’ची सुरवात अन् प्रवास, आता देशात घेतली जातेय दखल..!

| Updated on: Dec 16, 2021 | 11:01 AM

सुभाष पाळेकर यांनी देशासमोर आणलेल्या 'झिरो बजेट शेती'चा प्रवासही रंजकच आहे. जन्मताच त्यांची शेतीशी नाळ जोडलेली होती. त्यांचे वडीलही शेती व्यवसायच करीत होते. मात्र, विदर्भातील एका बेलोरा सारख्या खेडेगावातील पाळेकर यांच्या माध्यमातून ही क्रांती घडेल असे कुणालाही वाटले नव्हते. याची खरी सुरवात झाली ती महाविद्यालयीन शिक्षणापासून.

नैसर्गिक शेतीची सुरवात अन् प्रवास, आता देशात घेतली जातेय दखल..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई: (Subhash Palekar) सुभाष पाळेकर यांनी देशासमोर आणलेल्या ‘झिरो बजेट शेती’चा प्रवासही रंजकच आहे. जन्मताच त्यांची शेतीशी नाळ जोडलेली होती. त्यांचे वडीलही शेती व्यवसायच करीत होते. मात्र, विदर्भातील एका बेलोरा सारख्या खेडेगावातील पाळेकर यांच्या माध्यमातून ही क्रांती घडेल असे कुणालाही वाटले नव्हते. याची खरी सुरवात झाली ती महाविद्यालयीन शिक्षणापासून. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुभाष पाळेकर हे नागपूर येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. रासायनिक शेती विषयात त्यांनी शिक्षण हे पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी 1972 मध्ये वडीलांना मदत करण्यास सुरवात केली होती. सुरवातीच्या काळात त्यांनीही रासायनिक पध्दतीचाच अवलंब त्यांनी केला होता. मात्र, शेती व्यवसयातील अडचणी आणि उत्पादनातील घट यामुळेच ( Natural Agriculture) ‘झिरो बजेट’ शेतीचा अर्थात नैसर्गिक शेतीचा उगम झाला होता.

12 वर्ष रासायनिक शेतीचाच प्रयोग

आता नैसर्गिक शेतीचे महत्व जगाला पटलेले असले तरी सुरवातीच्या काळात सुभाष पाळेकर हे देखील रासायनिक शेतीच करीत होते. सलग 12 वर्ष रासायनिक शेती करुनही उत्पादनात घट होत असल्याने त्यांनी शेती व्यवसायाच्या मुळाशी जाऊन याची कारणे शोधण्याचा निर्धार केला. ज्यावेळी पाळेकर हे रासायनिक शेती करीत होते तो हरीत क्रांतीचा सुवर्णकाळ होता. या दरम्यान त्यांनी हरित क्रांतीचे तत्वज्ञान हे खऱे आहे तर मग उत्पादनात घट का असे म्हणत वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्धार केला होता.

1988 ते 2000 हा काळ ठरला टर्निंगपॅाईंट

शेती उत्पादन वाढीसाठी सुभाष पाळेकर यांनी अनेक कृषीतज्ञांचा सल्ला घेतला होता. पण उत्पादनवाढीचे गमक त्यांना समजले नव्हते. यात दरम्यान, त्यांच्या मनात आले की, जंगलात कोणी परिश्रम घेत नाही, मशागत करीत नाही, कोणत्या झाडाची देखभाल करीत नाही तर मग येथील झाडे उत्तम प्रकारे येतातच कशी? जंगलामध्ये मानवाशिवाय निसर्गाची स्वत:ची स्वंयपूर्ण व्यवस्था आहे तर मग याचा अवलंब आपण का करु नये म्हणून त्यांनी 1988 साली गावच्या शेतामध्ये हे नैसर्गिक शेतीचे प्रयोग करण्यास सुरवात केली होती. तब्बल 12 वर्ष त्यांनी हा प्रयोग स्वत:च्या शेतामध्ये केला होता. याच प्रयोगाच्या दरम्यान त्यांना शेती व्यवसयाचे गमक उलगंडलं ते म्हणजे जमिनीत अन् निसर्गातच सर्वकाही असल्याचे. यानंतरच त्यांनी संकरीत बियाणांचा कमी वापर आणि पारंपारिक बीज वापरून रोपं तयार करण्यावर त्यांनी भर दिला. सलग 12 वर्ष अभ्यास केल्यानंतर कृषी तंत्रज्ञान हे खोट्या तत्वावर आधारित असल्याचा त्यांनी निकष काढला. आणि याला पर्यायी शेती म्हणून नैसर्गिक शेतीचा उगम झाला

नैसर्गिक शेतीचे फायदे

रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन म्हणजे विषयुक्त अन्नाचा आपण पुरवठा करीत आहोत. हे बंद करायचे असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय पर्यायच नाही. नैसर्गिक शेतीमुळे कोणतेही आजार उद्भवत नाहीत. एकदा जर का सेंद्रिय शेतीतील अन्नाची सवय झाली तर पुन्हा कोणी रासायनिक खताचा वापर करणार नाही असा विश्वास सुभाष पालेकर यांना आहे. नैसर्गिक शेती करिता केवळ एका गाईची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 3 एकरातील जमिनीची जोपासना करण्यासाठी केवळ एका देशी गाईचे गोमूत्र आणि शेण आवश्यक असल्याचेही पालेकर म्हणाले आहेत. ‘झिरो बजेट शेती’ शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्याही रोखता येणार नाहीत. कारण रासायनिक खतावर होत असलेला खर्च आणि प्रत्यक्षात उत्पादन याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.

संबंधित बातम्या :

फळ काढणीनंतर असे करा व्यवस्थापन, अन्यथा होईल नुकसान

पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या

आता शेतकऱ्यांची चिंता वाढली, सर्वकाही पोषक असतानाही सोयाबीनचे दर…