लातूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगितले जात आहे.असे असले तरी (Central Government) सरकारची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातकच ठरत आहेत. यापूर्वी तूर (Toor Import) आयातीचा निर्णय कायम ठेवल्याने हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे तर आता केंद्र सरकारच्या एका निर्णयाचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. गेल्या 8 दिवसांपासून (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात घसरण सुरु आहे. केंद्राने सोयाबीन पेंडीची आयात केल्याने तब्बल 300 रुपयांची घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी सबंध हंगामात सोयाबीन हे चर्चेतले पीक राहिले आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. त्यामुळेच अनेकांनी सोयाबीनची साठवणूकही केली आहे. मात्र, केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा थेट परिणाम सोयाबीन दरावर झाला आहे. सोयाबीन पेंडीची आयात केल्याने येथील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला असून सोयाबीन मागणीत घट झाली आहे. सोयाबीनला 7 हजार रुपये असा दर आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 300 रुपयांची घसरण झाली आहे.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीनची खरेदी करुन साठवणूक करण्यापेक्षा लागेल तसे सोयाबीन खरेदीवर भर दिला होता. त्यामुळे उत्पादनाचा अंदाजही बांधता येत असत पण आता सोयाबीन पेंडची आयातच केली जात असल्याने अधिकच्या किंमतीमध्ये सोयाबीन खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा उद्योजकांनी खरेदीलाच ब्रेक दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा साठवणूकीचा उद्देश साध्य होणार की नाही हे पहावे लागणार आहे.
हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनला विक्रमी दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीवर भर दिला होता. मध्यंतरी 7 हजार 600 रुपये क्विंटलवर दरही गेले मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता. आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे पुन्हा दरात घसरण होऊ लागली आहे. सोयाबीनची विक्री नाही केली तर अवघ्या 15 दिवसांमध्ये उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे दर काय राहतील हे पहावे लागणार आहे.