सोलापूर : (Sorghum crop) ज्वारी हे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. मात्र, काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत असून कमी खर्चात अधिकच्या उत्पादनावर शेतकरी भर देत आहेत. जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मालदांडी ज्वारीचे उत्पादन, गुणवत्ता आणि उत्तम चव यामुळे भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. असे असताना देखील तालुक्यात (Kharif Season) खरिपात ज्वारी ऐवजी शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला आहे. (Soybean Crop) सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. भौगोलिक मानांकन मिळूनही ही स्थिती ओढावल्याने नेमक्या कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांना हा निर्णय घेतला असा प्रश्न पडत आहे. ज्वारीच्या क्षेत्रावर आता सोयाबीनने कब्जा घेतल्याचे चित्र आहे.
शेतकरीही आता कमर्शियल होत आहे. बाजारपेठेतील मागणी आणि उत्पादनावर होणारा खर्च पाहूनच पीक पध्दतीला महत्व दिले जात आहे. ज्वारीला मिळणारा भाव आणि करावी लागणारी मेहनत पाहता शेतकरी आता सोयाबीन पेऱ्यावर भर देत आहे. शिवाय भौगोलिक मानांकन मिळाले तरी तालुक्यात या मालदांडी ज्वारीला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे कष्टाचे मानाने मिळत असलेले उत्पन्न हे तुटपूंजे असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामात तर हे अधिक तीव्रतेने जाणवत आहे. कारण खरिपात ज्वारीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
मालदांडी ज्वारीचा केवळ खाण्यापुरताच वापर होत आहे. प्रक्रिया उद्योगातून याला चालना मिळालीच नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात होत असलेली वाढ यामुळे शेतकरी सूर्यफुल, सोयाबीन, करडई यावर भर देत आहे. गेल्या दोन वर्षापासून तेलबियांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही याला प्रोत्साहन मिळत आहे. बीजोत्पादन कार्यक्रम, पेरणीचे मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात असल्याने पीक पध्दतीमध्ये बदल झपाट्याने होत आहे. जोडवळ पध्दतीने सोयाबीनची लागवड, रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणी, बेडवर टोकन पध्दतीने लागवड आदी प्रकार वाढत आहेत. त्यामुळे उत्पादनातही वाढ होत आहे.
मंगळवेढा तालुक्यात विकेल ते पिकेल या अभियाअंतर्गत करडईचे 935 हेक्टर क्षेत्र ठरविण्यात आले आहे. यातच शेतकऱ्यांनी तेलवर्गीय पिकांनाच शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा विकेल ते पिकेल अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तर दुसरीकडे सोयाबीन बिजोत्पादनातून उत्पादनाचा स्त्रोत तयार केला आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीनचे क्षेत्र हे 153 हेक्टरने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्साह आणि कृषी विभागाचे वेगवेगळे उपक्रम हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहेत.