नाशिक : राज्यातील काही भागामध्ये (Rain) पावसाने उसंत घेतली असली तरी (Nashik Market) नाशकात मात्र सतंतधार सुरुच आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आता (Vegetable Rate) भाजीपालाही पाण्यातच अशी अवस्था आहे. उत्पादनात घट अन् बाजारपेठेत मागणी यामुळे भाजीपाल्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढत आहेत. निसर्गाच्या लहरीपणातून यंदा कोणत्याच पिकाची सुटका झालेली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे राज्यातील 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले असताना आता भाजीपाल्याच्या उत्पादनातही मोठी घट होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत आवक घटली आहे. उत्पादन घटल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय असेही नाही.
श्रावण महिना सुरु होताच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची मागणी वाढते. असे असताना मार्केटमध्ये केवळ बटाटे, टोमॅटो आणि वांगी हेच मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. याच्या दरामध्येही तब्बल 30 ते 40 टक्वे वाढ झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो असे नाहीतर ग्राहक आणि शेतकरी यांच्या मधला दुवा असलेले व्यापारीच अधिक फायद्यात राहत आहेत. शिवाय श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. परिणामी भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत तुटवडा असल्याने दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
पावसाचा परिणाम एका विशिष्ट भाजीपाल्यावर नाहीतर सर्वच भाजीपाल्यावर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दर हे वाढलेले असतात. यंदा मात्र, 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. शिवाय पावसामुळे नव्या भाजीपाल्याची लागवडही करणे शक्य़ नाही. त्यामुळे भविष्यात दरात आणखी वाढ होणार असल्याचे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे. कोथिंबीर,शिमला मिरची,गिलके,दोडके,वांगे,कोबी अशा सर्वच भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्याचं नाशिकच्या बाजार समितीत दिसून येत आहे.
एकीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ ही ठरलेलीच आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच दुसरीकडे रोजचा लागणारा भाजीपालाही चांगलाच भाव खात आहे. सर्वच भाजीपाल्याचे दर 80 ते 100 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे महिला आता डाळीवरच भर देत आहेत. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. घटत्या उत्पादनाबरोबर वाहतूकीचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ ही सुरुच आहे.