सांगली : काळानुरूप पीक पध्दतीमध्ये बदल हा होणारच आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा पांढर सोन शिवारात बहरताना दिसणार आहे. 15 वर्षापासून कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र, तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा संकल्पच आटपाडी बाजार समितीच्या माध्यमातून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर 200 शेतकऱ्यांनी 100 एकरावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कापसाचा तालुका म्हणून पुन्हा आटपाडीला गतवैभव मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा कापसाची उलाढाल होणार असल्याचा विश्वास व्यापारी व्यक्त करीत आहेत.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जात होते. येथील सुतगिरण्या आणि त्यामुळे निर्माण झालेली परस्थितीमुळे कापसाचे क्षेत्र हे वाढतच गेले. मात्र, दरम्यानच्या काळात बोगस बियाणांमुळे सलग तीन वर्ष शेतकऱ्यांना उत्पादनच मिळाले नाही. एवढेच नाही तर याच काळात या भागात पावसाचेही प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला बाजूला सारत इतर पिकांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली होती. कापूस हे पीक घ्यायचेच नाही असा निर्धारच आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला होता.
कापसाचा तालुका म्हणून आटपाडीची ओळख होती. शिवाय एक प्रसंग वगळता दरवर्षी कापसातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाले होते. पण गेल्या 15 वर्षापासून येथील शेतकऱ्यांनी कापसाचा नादच केला नाही. मात्र, तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. शिवाय हा बदल घडवून आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर 200 शेतकऱ्यांनी 100 एकरावर कापसाची लागवड केली आहे. त्यामुळे यंदा जर साधले तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.
व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांना येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी मदतीचा हात पुढे केल्यानेच हे शक्य झाले आहे. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कापूस क्षेत्र वाढवण्याची संकल्पना ही विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र एस. वाघ,डॉ. नवनाथ मेढे यांच्यासह अनेकांना सांगण्यात आले. त्यानुसार कापूस लागवड आणि व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्य़ा मानसिकतेमध्ये बदल झाला असून 100 एकरामध्ये प्रयोगिक तत्वावर कापूस लागवड झाली आहे.