नागपूर : (Farming) शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान हे ठरलेलं आहे. त्यानंतर पीक पाहणी, पंचनामे, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी होतात पण ना कोणती मदत ना यावर काही तोडगा. (Crop Loan) पीक कर्जापूर्वी तर शेतकरी हे सावकाराकडून कर्ज घेऊन शेती कामे करीत होता. शेतकरी हा सर्वकाही दुसऱ्यासाठी करतो पण त्याच्या प्रश्नकडे लक्ष देणारा अजून जन्मलेलाच नाही असे म्हणत एका शेतकऱ्याने सांगा शेती करायची कशी ? असा सवाल त्याने थेट (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला जावा अशी मागणी शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेतने अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पीककर्ज योजनेपूर्वी आणि आताही शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय मार्गच नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज मिळते असे नाही. त्यामुळे 3 टक्के व्याज दराने किंवा दोन धानाच्या पोत्याला तीन पोते धान द्यावे लागते. आजही शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर यामुळेच आहे तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. खरेदी केंद्रावर केवळ व्यापाऱ्यांच्या धानालाच महत्व दिले जाते. व्यापाऱ्यांकडील धान खरेदी करुन केंद्र हे उद्दिष्टपूर्ती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय तर होतोच पण पुन्हा कमी दरात धान हे खुल्या बाजारपेठेत विकण्याची नामुष्की येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
पीक नुकसान झाले की स्थानिक नेत्यांपासून ते मंत्री, आमदार हे बांधावर येतात. पाहणी, पंचनामे ही औपचारिकता केली जाते पण प्रत्यक्षात भरपाईबाबत कमालीची उदासिनता आहे. धान पिकासाठी शेतकऱ्याला एकरी 25 हजार रुपये एवढा खर्च असतो तर शासकिय मदत ही केवळी 10 ते 12 हजार. त्यामुळे दरवर्षी शेती व्यवसायातून शेतकऱ्यांचा घाटाच झालेला आहे. मदत आणि कायमस्वरुपी तोडगा याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
केवळ पीक पाहणीची औपचारिकता न करता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय हे देखील जाणून घेतले आहे. केवळ धान पिकांचीच लागवड केली जाते का? वातावरण चांगले असल्यावर उतारा किती पडतो? आता धान लागवडीसाठी रोपे दिली तर काय स्थिती राहिल? या सबंध प्रश्नांची उकल शेतकऱ्यांनीच केली आहे. त्यामुळे केवळ पाहणी नाही तर शेतकऱ्यांचे नेमके गऱ्हाणे काय हे त्यांनी जाणून घेतले आहे. एवढेच नाही तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांनी जाणून घेतले आहे.