तुळजापूर : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे. धाराशीव जिल्ह्यातील मोरडा या गावातील द्राक्षपीक उद्ध्वस्त झालं. दोन एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झालेली आहे. लाखो रुपयांचे नुकसान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाले आहे. द्राक्ष्याचे वेल जमिनीवर पडलेत. कष्टाने पिकवलेलं पिक मातीमोल झालंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे बागा जपलेल्या असतात. मात्र, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. अस्मानी संकटाकमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
महिला शेतकरी सीताबाई सुरवसे म्हणाल्या, होत्याचं नव्हतं झालं. दोन एकर शेत घेतलं. मुलांना शाळा शिकवलं. त्यांना नोकऱ्या लागल्या नाही. कर्ज काढून बागा लावून दिल्या. पहिलं वर्ष लॉकडाऊनमध्ये गेलं. गेल्या वर्षी पाणी लई झालं. यंदा काही घ्यावं म्हटलं तर अवकाळी पावसानं सगळं वाटोळं केलं.
आता कर्ज कुठून काढावं. कालचं माझी तब्यत बरी नव्हती. मुलांनी रात्री दवाखान्यात नेलं. आता मला घरी आणलं. मला झटका येत होता. म्हणून दवाखान्यात गेलो तिथं बीपीच्या गोळ्या दिल्या.
द्राक्ष बाग उभी करण्यासाठी दहा लाख खर्च केले. वीस लाख रुपये द्राक्षबागेतून निघाले असते. पण, अवकाळी पावसानं सारं नेलं. सीताबाई सुरवसे म्हणाल्या, वर्षभर काय खाणार. बँकेचं कर्ज आहे. सोनं गहाण ठेवून पिक वाढवलं. कर्जबाजारी होऊन हे सगळं उभ केलं आहे.
दोन एकरात उभं करायला १० लाख रुपये लागवडीसाठी खर्च झाले. २० लाखांचं उत्पन्न निघणं अपेक्षित होतं. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ मदत द्यावी, ही विनंती आहे. दुकानाची उधारी आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र बँकेची नोटीस आली होती. अशी आपबिती सीताबाई सुरवसे यांनी सांगितली.
अशीच काहीसी परिस्थिती इतर द्राक्षबागायतीदारांची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत. पंचनामे झाले की, आठवड्याभरात मदत मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.