धुळे : राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मोठं नुकसान केलं आहे. रब्बी हंगामातील (Rabbi Season) अनेक पीक मातीमोल झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून शेतकरी सरकारकडून काय मदत मिळते याकडे डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. कांद्याचा वांधा हा शेतकऱ्यांची (Farmer) पाठ सोडायला तयार नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा विकून एका शेतकऱ्याला 1400 रुपये हाती मिळत आणि त्याला हा कांदा बाजारात आणण्यासाठी अकराशे पन्नास रुपयांचा खर्च लागला. अशा परिस्थितीत 250 रुपये शेतकऱ्यांच्या हाती आले. अशी दुर्दैवी परिस्थितीत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे.
कांद्याला अनुदान जाहीर करूनही ते शेतकऱ्याला परवडणार नाही अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. कांद्याला किमान आधारभूत किंमत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने ज्या कांदा अनुदानाची घोषणा केलेली आहे, त्याचा लाभ अद्याप मिळालेला आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू पिक काढण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून गहू काढणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. एकाच वेळेस सर्व शेतकऱ्यांनी गहू काढणीला सुरुवात केल्यामुळे मजुरांची व गहू मळणी यंत्रांची कमतरता भासत आहे. अनेक शेतकऱ्यांचं गहू पीक अवकाळी पावसात ओलं झाल्यामुळे ते काढायलाही परवडणार नाही. मात्र गहू शेतात उभा ठेवता येणार नाही, त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना पदरमोड करून हा गहू काढण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारामध्ये गावाला दोन हजारापासून तर अडीच हजार पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. उत्पन्न कमी होऊ नये, गव्हाच्या दरात वाढ नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अधिकारी आणि मंत्र्यांनी शेतीची पाहणी केली आहे, त्याचबरोबर मदत करु असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहेत.