नांदेड : निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती (Nanded Farmer) नांदेडमधील शेतकऱ्यांना येत आहे. आठ दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेंब-थेंब पाणी पिकांना देण्याची नामुष्की होती तर आज हीच पिके पाण्यात आहेत. हादगाव तालुक्यात पावसाने हाहाकार केला आहे. जांभळा शिवारात शनिवारी (Heavy Rain) ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. यामध्ये सातत्य असल्याने जागोजागी पाणी साचले असून (Crop Damage) पिके उगवताच पंचनामे करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. जमिनीत गाढलेले बियाणे वाहून गेले तर उगवलेल्या पिकात पाणी साचून राहिले आहे. जांभळा शिवारातील शेतजमिनी खरडून गेल्याचा प्रकार घडला आहे. उशीरा आलेला पाऊसही सोबत संकट घेऊन आल्याच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत.
मध्यंतरी जिल्ह्यात पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी धूळपेरणीचा प्रयोग केला होता. यामध्ये हळद, कापूस आणि काही क्षेत्रावर सोयाबीनचाही प्रयोग झाला होता. आता पाऊस प्रमाणात असता तर कदाचित याचा फायदा या पिकांना झाला असता. मात्र, ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि बियाणेही पाण्यात गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती पण काही मंडळात पावसाने थैमान घातले आहे. जांभळा येथील ओढे, नाले हे तुडुंब भरुन वाहत आहेत. मात्र, पेरलेल्या आणि उगवण झालेल्या पिकांचेही नुकसान झाल्याने पंचनामे करुन मदतीची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मराठवाड्यात सर्वात आगोदर धूळपेरणीची सुरवात नांदेड जिल्ह्यामध्य़ेच झाली होती. अपेक्षित पाऊस नसतानाही भविष्यातील पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली पण अतिरिक्त पावसामुळे सर्वकाही पाण्यात गेले आहे. कृषी विभागाने वेळोवेळी धूळपेरणी करु नये असे आवाहन केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आता पाहवयास मिळत आहे. पेरणीपूर्वी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर पेरा करावा, 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावरच पेरणीचे धाडस करण्याचा सल्ला दिला जात आहे.
खत, बी-बियाणांवर खर्च करुन शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली खरी मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची उगवण होताच नुकसान झाले आहे. पिके पाण्यात एवढेच नाही तर शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांची परस्थिती हालाकीची आहे. भरघोस उत्पादनाची अपेक्षा असतानाच पावसाच्या लहरीपणामुळे पिकांसह शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे पंचनामे करुन आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.