वाशिम : राज्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. गारपीट झाल्याने पिकांची नासाडी झाली. यात सापडला तो वाशिम येथील एक कलिंगड उत्पादक शेतकरी. त्यांनी दोन एकर जागेत कलिंगड लागवड केली होती. पण, गारपिटीत हे कलिंगड वाया गेले. आता लाखमोलाचे कलिंगड फेकण्याची वेळ आली आहे. व्यापारी त्याचे कलिंगड खरेदी करण्यासाठी फटकतही नाही. त्यामुळे त्यांची विक्री कुठं करावी, असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे त्याने शेतातच गंजी मारून हे कलिंगड ठेवले. आता हे कलिंगड कुणी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे जनावरांना चारण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नाही.
वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील कलिंगड उत्पादक शेतकरी. त्र्यंबक यशवंत अवचार असे त्यांचे नाव. त्यांनी या वर्षी दोन एकर कलिंगडाची लागवड केली. परंतु मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कलिंगड व्यापारी घेत नाहीत. त्यामुळे शेतात गंजी मारुन ठेवायची वेळ आली आहे.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलिंगडाची लाली यावर्षी फिकी पडली. वाशिम जिल्ह्यातील कलिंगडाला व्यापारी पुकट घेत नाही. शेतकऱ्यांनी फळ तोडून लिंबाच्या झाडाखाली गंजी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर लाखमोलाचे कलिंगड फेकून देण्याची वेळ आली आहे.
दुसरीकडे, कोकणात कलिंगड शेती यंदा चांगलीच बहरली आहे. सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाची शेती केली. या कलिंगडाला गोवा तसेच स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सिंधुदुर्गातील तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली.
मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे या शेतीतून शेतकऱ्यांना चांगलाच नफा झाला आहे. कोरोना काळात याच शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. शेकडो एकरवर केलेली कलिंगडाची शेती वाया गेली होती. शेकडो टन कलिंगड शेतातचं कुजून नासाडी झाली होती. यंदा मात्र मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी चांगलाच आनंदात आहे. कलिंगड उत्पादकाची अशी दुहेरी परिस्थिती आहे. एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख आहे.