भंडारा : निसर्गाच्या लहरीपणापासून राज्यातील कोणत्याच जिल्ह्याची सूटका झालेली नाही. सततच्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामाबाबच प्रश्न उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्हा तसा (Paddy Crop) धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक क्षेत्रावर धानाचीच लागवड केली जाते. यंदा लागवडीला उशिर होत असला तरी शेतकऱ्यांचा भर हा याच पिकावर आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्यातील (Vegetable) भाजीपाल्याला देखील वेगळेच महत्व असून येथील वांग्याला ही परजिल्ह्यातून आणि परराज्यातून मागणी असते. यंदा मात्र, खरिपातील पिके आणि भाजीपाला हा पाण्यातच आहे. राज्यात इतर ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी भंडारा जिल्ह्यामध्ये संततधार ही सुरुच आहे. त्यामुळे वांग्याची रोपे ही जागेवर कुजली आहेत तर दुसरीकडे धान लागवड ही वेळत होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगमातील धान पीक हेच मुख्य पीक आहे. मात्र, याचबरोबर भाजीपाल्यातूनही उत्पादन वाढवावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड केली होती. शिवाय लागवडीपासून पोषक वातावरण असल्याने वाढही जोमात झाली. मात्र, ऐन वांगी लागवडीच्या दरम्यानच पावसाने असा काय धडाका सुरु केली आहे की, सबंध वावरामध्ये पाणी साचून राहिलेले आहे. एक-दोन दिवस पाणी साचले असते तर उत्पादनावर परिणाम झाला नसता पण गेल्या 10 दिवसांपासून पीक पाण्यात आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण निसर्गाने सर्वकाही हिरावले असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
उत्पादनाबरोबरच शेतीमालासाठी गरज असते ती बाजारपेठेची. भंडारा जिल्ह्यातील वांग्याला नागपूर, गोंदिया याच बरोबर मध्य प्रदेशातून देखील मागणी असते. जवळच्या बाजारपेठेचा फायदा येथील शेतकऱ्यांना होतो. म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले होते. मात्र, अधिकच्या पावसामुळे मुख्य पिकांवर तर परिणाम झालाच आहे. पण भाजीपाल्याचे देखील न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. काळाच्या ओघात शेतकरी आवश्यक ते बदल करुन उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे पण त्याला निसर्गाचीही साथ मिळणे तेवढेच गरजेचे आहे.
यंदा शेती व्यवसायाबाबत सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. हंगामाच्या सुरवातीलाच अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी किंवा भाजीपाल्याची पुन्हा लागवड ही शक्य होणार नाही. शिवाय पेरणी आणि मशागतीवर शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च झाला आहे. खरीप हंगामातील पिकांची पाहणी करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. मात्र, अद्यापही पंचनाम्याला देखील सुरवात झालेली नाही.