सांगली : शेती असूनही निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनातच घट, शेती व्यवसयात काही राम नाही अशी एक ना अनेक कारणे सहजच आपल्या कानी पडतात. पण प्रबळ इच्छाशक्ती आणि वेगळे काही करुन दाखवायची धमक असल्यावर काय होऊ शकते हे (Sangli District) सांगली जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. नावावर 1 गुंठाही जमिन नसताना शिराळा तालुक्यातील पनुब्रे वारुन गावच्या संदीपने (Vegetable) भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. आता (Farm Land) शेतजमिनीशिवाय हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे पण संदीपने ही किमया पाण्याच्या बाटलीतून साधली आहे. घरासमोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्लॅस्टिकच्या बाटलीत त्याने वांगी आणि मिरचीचे पीक घेतले आहे. हा केवळ दिखावा नाहीतर आतापर्यंत 6 किलो वांग्याची तोडणीही झाली आहे.
शेतीक्षेत्र नसले तरी किमान घरी आवश्यक तो भाजीपाल्याचे उत्पादन मिळायलाच पाहिजे असा विचार संदीपने व्यक्त केला होता. त्यासाठी त्याने प्लॅस्टिकच्या बाटल्या उलट्या करुन त्यामध्ये वांगे लावले होते. सुरवातीला मुंबईहून आलेलं पोर आहे असे काहीपण प्रयोग करणारच असे म्हणत त्याला हिनवण्यातही आले पण आता या बाटलीतील वांग्याला वांगे लागले आहेत. आतापर्यंत 6 किलो वांग्यांची तोड झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी मिरच्याची सुध्दा रोप दुसऱ्या बाटलीत शेजारी लावली आहेत.
संदीप व त्याची आई हे मुंबई येथे वास्तव्यास होते. मात्र, जी वेळ कोरोनामुळे अनेकांवर तीच या फाळके कुटुंबियांवर आली. त्यांनाही मुंबई सोडून गाव जवळ करावे लागले होते. शिवाय शेती नसल्याने मत्स्य व्यवसयातून या फाळके कुटुंबियांचा उदरनिर्वाह होतो. गावातील गोसावी समाजातील कुटुंबियांना शेती क्षेत्रच नाही. त्यामुळे इतर व्यवसाय किंवा मजुरी करुनच कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. अशा हलाकीच्या परस्थितीमध्येही संदीपने आपले वेगळेपण जोपासले आहे.
प्लॅस्टिकच्या टाकाऊ बाटल्यांचा खऱ्या अर्थाने संदीपने उपयोग करुन घेतला आहे. त्याने आपल्या घरोसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बाटल्या उलट्या करुन वांगी लावली आहेत. यामुळे सूर्यप्रकाश तर मिळत आहेच पण बाटलीच्या वरती छिद्र पाडून या भाजीपाल्याला पाणी दिले जात आहे. गेल्या 2 महिन्यात वांग्याचे पीक वाढवले असून आतापर्यंत 6 किलो वांग्याची तोड झाली आहे. यामधून वांग्याची विक्री तर होणार नाही पण घरच्या भाजीपाल्याचा विषय त्यांनी निकाली काढला आहे. त्यामुळे इच्छा असेल तर मार्ग निघतोच हे संदीपने दाखवून दिले आहे.