मनोज गडेकर, प्रतिनिधी, अहमदनगर : राहाता तालुक्यातील वाकडी येथील विक्रांत काले या तरुण शेतकऱ्याने आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडली. वडिलोपार्जित शेती फुलवली आहे. विक्रांत काले याने तालुक्यात पहिल्यांदाच सफरचंदाची बाग लावून यशस्वी केली होती. आता त्याने शेतीत आणखी एक नवीन प्रयोग करत पांढऱ्या जांभळाचे यशस्वी उत्पन्न घेतलंय. तीन वर्षांपूर्वी १२ बाय १२ फुटावर प्रत्येकी एक रोप याप्रमाणे एकरी ३२५ झाडे लावली. ही झाडे मोठी होईपर्यंत विक्रांत याने तीन वर्षे आंतरपीक देखील घेतलं. आता या झाडांना फळे लागली. साधारण २५० रुपये किलो भावाने विक्री सुरू केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथील युवा शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या जांभळाची बाग फुलवली. लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया करून दाखवलीय. आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी सोडून विक्रांत काले या तरुणाने शेतीतून आपल्या आर्थिक प्रगतीचा नवा मार्ग शोधलाय.
एका झाडाला पहिल्याच वेळी ७ ते ८ किलो फळे निघत आहेत. सध्याचा भाव लक्षात घेता प्रत्येक झाडामागे १ हजार तर एकरी ३ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा विक्रांतने व्यक्त केलीय. पाच वर्षानंतर याच झाडांना प्रत्येकी २५ किलो फळे मिळू शकतात, असे काले याने सांगितलंय.
एकीकडे अतिवृष्टी, शेती मालाचे पडलेले बाजार भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे विक्रांत काले या तरुण शेतकऱ्याने प्रयोगशील शेतीतून साधलेली आर्थिक प्रगती इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
जांभूळ झाड पंचवीस वर्षे टिकते. बाग उभी करण्यासाठी एकदाच मशागत करावी लागते. खते आणि औषधांचा खर्च गृहित धरून एकरी साधारण दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. पहिले तीन वर्षे आंतरपीक घेऊन त्यात खर्च वसूल होतो. दरवर्षी एकरी खते आणि औषध याचा खर्च साधारण ३५ ते ४० हजार रुपये लागतो.
जांभळ्या रंगाच्या जांभळाचे उत्पादन जूनमध्ये निघते. त्या अगोदर पांढरे जांभूळ चांगला भाव खाऊन जाते. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांनादेखील हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.