मुंबई : येत्या 48 तासांत राज्यात पावसाची (Rain Update) शक्यता आहे. चक्रीय वाऱ्यामुळे राज्यात पुढचे दोन दिवस पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात वाऱ्याची चक्राराक स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावरही जाणवू लागला आहे. अशातच आता येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं (IMD) म्हटलंय. 19 एप्रिल मंगळवार आणि 20 एप्रिल म्हणजेच बुधवारी राज्यात पाऊस होऊ शकतो, असं सांगितलं जातंय. दोन दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून या पावसामुळे वाढलेल्या तापमानातून (Temperature) दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या 24 तासांत वाऱ्यांच्या बदललेल्या स्थितीमुळे तापमानात बदल झाल्यानं पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळे राज्यात विदर्भ वगळता बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्हे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भातील तापमान वाढलेलंच असून वैदर्भीय जनता वाढलेल्या पाऱ्यानं घामाघूम झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसानं हजेरी लावलेली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता असून याचा फटका आंबा आणि काजूवर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं द्राक्ष पिकांवर आणि काढणीच्या पिंकावरही होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दरम्यान, भारतीय हवामान विभागानं नुकताच पावसाचा यावर्षीचा पहिला अंदाज वर्तवला होता. यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस बरसेल, असं हवामान विभागानं म्हटलेलं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळे बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, गारा, वातावरणातील अनियमित तापमान या सगळ्यामुळे गेलं वर्षभर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अशातच आता पावसाच्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांऱ्यांच्या जीवात जीव येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून नेहमीप्रमाणेच राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 880.6 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
एकीकडे राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी दुसरीकडे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पारा वाढलेलाच आहे. नागपुरात तापमान 43 अंशांवर पोहचलंय. त्यामुळे नागपूरकरांची लाहीलाही होतेय. नागपुरात दरवर्षी पारा वाढत असतो मात्र या वर्षी एप्रिल महिन्यातच तापमान 43 च्या पार झालंय. मे महिना अजून लागायला वेळ आहे. मात्र तापमानात वाढ झाल्याने त्याचा मोठा परिणाम वेळेआधीच जाणवू लागलाय. त्यामुळे नागपूरकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. जातंय. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतही तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
Sangli जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस