नांदेड : महिन्याभरापूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीत मराठवाडा विभागात (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस असल्याची नोंद होती. त्यामुळे यंदाच्या खरिपाचे सोडा पण रब्बी हंगामाचाही विषय मार्गी लागला असेच चित्र होते. पण मान्सून किती लहरी आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कारण 10 ऑगस्टपासून या जिल्ह्याकडे वरुणराजाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे (Kharif Season) खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिके करपू लागली आहेत. वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसत आहे. खरीप हंगाम हा पावसावरच अवलंबून असतो. पण गेल्या दोन महिन्याच्या काळात तीन वेळा मान्सूनने आपले वेगळेपण दाखवले आहे. त्यामुळे नियमित वेळी खरिपातील पेरण्या तर झाल्याच नाहीत पण आता पीक वाढीवर आणि उत्पादनावरही या निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम होणार असेच चित्र आहे. ऐन फळधारणेच्या वेळीच पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पाऊस पडून आणि नाही पडूनही शेतकऱ्यांचे व्हायचे ते नुकसान टळत नाही हेच खरे असेच म्हणण्याची वेळ बळीराजावर आहे.
यंदा खऱ्या अर्थाने जुलै महिन्यातच राज्यात मान्सून सक्रिय झाला. पावसाने उशिरा हजेरी लावली पण दमदार अशी. त्यामुळे खरीप हंगामातील पिके बहरुन उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या 20 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे पिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, ज्या पिकाचा सर्वाधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे तेच सोयाबीन आता करपू लागले आहे. वाढत्या उन्हामुळे पिकांना मान्या टाकल्या आहेत. आता गरजेच्या वेळी पावसाने हजेरी न लावल्याने उत्पादनात घट निश्चित आहे. मराठवाड्यात यंदाही सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचाच पेरा झाला आहे. त्यामुळे याच पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
15 दिवसांपूर्वीच खरीप हंगामातील पिके ही जोमात होती. मात्र, पाऊस एवढी ओढ देईल असे वातावरणही मंध्यंतरी नव्हते. पण आता सोयाबीन फुलोऱ्यात आहे. काही ठिकाणी फुलेही लागलेली आहेत. त्यामुळे ही स्टेप ओलांडली तर पिके पदरात असे चित्र असते. पण गेल्या 20 दिवसांपासून पावसाने उघडीप तर दिलीच पण कडाक्याचे ऊन पडले आहे. त्यामुळे खरिपाचे मोठे नुकसा होत आहे.
एकतर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हे अनुदानाबरोबर पीक विमा रक्कमही मिळावी यासाठी आग्रह करीत आहेत. शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम मिळाली तर त्याचा उपयोगही होणार आहे. त्यामुळे अनुदानाबरोबर पीकविम्याची संऱक्षित रक्कम लागलीच देणार का? हा मोठा प्रश्न आहे.