परभणी : (Monsoon) हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी हा पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. आता (Meteorological Department) हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी मोठी रीस्क घेतली असून शेतामध्ये धुळपेरणीला सुरवात केली आहे. या विभागातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये याचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यात 20 जूनपासून पावसाचा अंदाज वर्तवल्याने आम्ही हे धाडस करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, हवामान विभागाचा अंदाज फेल ठरला तरी शेतकऱ्यांची धुळपेरणीही धोक्यातच. पण पावासाची वाट बघत वेळ घालण्यापेक्षा धुळपेरणी करुन शेतकरी मोकळा झाला आहे. यामध्ये कापसाच्या पेऱ्यावर अधिकचा भर आहे.
मराठवाड्यात पावसाची नाही पण सध्या केवळ धुळपेरणीचीच चर्चा अधिक आहे. यामध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्हे हे आघाडीवर आहेत. धुळपेरणी म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. पाऊस दाखल झाला नसताना आणि शेत जमिनीत पुरेशी ओल नसताना पेरणीचे केलेले धाडस म्हणजे ही धुळपेरणी होय. आता यामध्ये पेरणीनंतर लागलीच पाऊस झाला तर साधलं नाहीतर मग पेरलं ते गंगेला मिळालं असंच काहीतरी होते. मात्र, हा धोका पत्करुन सुध्दा शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवतातच. त्यामुळेच परभणी जिल्ह्यामध्ये तब्बल 61 हजार हेक्टरावर कापूस लागवड झाली आहे. सोयाबीनबाबत मात्र शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे.
मराठवाडा विभागातील केवळ तीन जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे ते ही तुरळक ठिकाणी. राज्यात इतरत्र मान्सून सक्रीय होत असला तरी या विभागातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याचा काही भाग यामध्ये अजून पावसाचे आगमनही झाले नाही. जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात पिके वाढीला लागतात तिथे शेतकऱ्यांना धुळपेरणीचा धोका पत्करावा लागत आहे.
हवामान विभागाने 20 जूनपासून मराठवाड्यातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याच जोरावर गेल्या काही दिवसांपासून धूळपेरणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत हवामान विभागाचे अंदाज तंतोतंत खरेच ठरलेत असे नाही. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या जोरावर पेरा केला आहे. जर पाऊस झाला तर साधले अन्यथा कोरड्या जमिनीत गाढलेल्या बियांणा कीडे खाऊन टाकतात. पावसाची उघडीप कायम राहिली पिकांची उगवणच होत नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होते.