लातूर : (Summer Crop) उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी जो (Soybean Crop) सोयाबीनचा प्रयोग केला होता तो यशस्वी होताना दिसत आहे. कारण सोयाबीन काढणी सुरु असून उन्हाळ्यातील वातावरण पोषक असल्याचे उत्पादकतेवरुन दिसून येत आहे. पाण्याची उपलब्धता आणि अवकाळीचे संकट दूर झाल्याने उन्हाळी सोयाबीन चांगलेच बहरले होते. आता काढणी करुन शेतकरी विक्री करण्याच्या तयारीत असेल तर (Soybean Rate) सोयाबीनचे दर अवगत असणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असून आता सोयाबीन हे 6 हजार 750 असा दर आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची साठवणूक की विक्री हा प्रश्न कायम आहे.
उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता ही कमी असते असे सांगितले जात होते पण झाले उलटेच. पोषक वातावरणामुळे बिगर हंगामातही उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आहे. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे परिश्रम हे कामी आले आहेत. एकरी 8 ते 9 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जो उद्देश ठेऊन हा वेगळा प्रयोग केला होता तो यशस्वी झाला आहे. आता अपेक्षित दर मिळाला तर मोहिम फत्तेच होईल आशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
गेल्या महिन्याभरापासून केवळ सोयाबीनच नाही तर तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घट होत आहे. एप्रिल महिन्यात सोयाबीनला 7 हजार 100 असा दर होता. मात्र, सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच दरात घसरण सुरु झाली होती. आता 6 हजार 750 सोयाबीनला दर मिळत आहे. ज्या काळात सोयाबीनचे दर वाढणे हे अपेक्षित होते. तिथे शेतीमालाच्या दरात घसरण सुरु झालेली आहे. तूरीलाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला आहे तर दुसरीकडे हरभऱ्याचा हमीभाव आणि बाजारभाव यामध्ये 1 हजार रुपयांची तफावत असल्याने खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.
सध्या सर्वच शेतीमालाचे दर हे घसरत आहेत. सोयाबीन दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण आता 6 हजार 750 दर मिळत आहे. हा सरासरी एवढा दर आहे. मात्र, उन्हाळी हंगामात उत्पादन आणि उत्पादकता पाहता शेतकऱ्यांनी काही काळ थांबून सोयाबीन विक्रीचा विचार करावा असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादन तर घेतले आहे पण मनातला दर सोयाबीनला मिळणार का हे पहावे लागणार आहे.