जालना : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य सरकार विविध योजना आणि सोई-सुविधा राबवत आहे. यंदा तर अडचणीच्या काळात (Crop Loan) पीककर्जाचा उपयोग व्हावा म्हणून राज्य सरकारने धोरणांमध्ये बदल केला आहे. अर्थ संकल्प सादर होताच मे महिन्याच्या 1 तारखेपासूनच पीककर्ज वितरणाचे आदेश संबंधित (Bank Loan) बॅंकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे (Kharif Season) खरीप पेरणी सुरु होण्यापूर्वी ही कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यास त्याचा योग्य वापर होणार आहे. हा बदल यंदाच्या वर्षापासूनच करण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला लागावे, खत, बी-बियाणे हे कमी न पडू देण्याची जबाबदारी सरकरची आहे. त्याचा वेळेत पुरवठा होईल तुम्ही उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी खरीपपुर्व हंगाम बैठकीत शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची गरज भासते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत समन्वय साधुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. ज्या बँकां त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत, अशा बँकांमधील शासकीय ठेवी तातडीने काढून घेण्यात याव्यात व या बँकांची तक्रार रिजर्व्ह बँकेकडे करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज जोडणीही वेळेत मिळेल यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना ही शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेच्या माध्यमातुन कृषिविषयक कामांना देण्यात येणाऱ्या पूर्वसंमती मंजुरीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असुन शेतकऱ्यांना कामांसाठी पूर्वसंमती ही वेळेत मिळाली पाहिजे.
आढावा बैठकी दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले की, खरीप हंगाम 2022 मध्ये जिल्ह्यात 6 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याासाठी 1 लाख 66 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे बदल दरानुसार 71 हजार 142 क्विंटल बियाणे आवश्यक असुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे ए.जे. बोराडे, कल्याण सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.