वाशिम : (Kharif Season) खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. उत्पादनात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा या दृष्टीकोनातून (Agricultural Department) कृषी विभाग कामाला लागला आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. जेणेकरुन भविष्यात त्यााच फायदा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी होणार आहे. गतवर्षी अधिकच्या पावसामुळे (Soybean) सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बियाणांचा तुटवडा भासू शकतो. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच भर देण्याचे अवाहन कृषी विभागाने केले आहे. एवढेच नाही तर यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला असला तरी यंदा नियोजनात कोणती चूक होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेतली जात आहे.
बाजारपेठेतील बियाणांची उगवण झाली पण शेंगाच लागल्या नाहीत अशा सोयाबीनबाबत तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यंदा तर पावसामुळे गतवर्षीच्या सोयाबीनचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे बियाणे कितपत योग्य राहिल याबाबत साशंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांची उगवण क्षमता पाहून हेच बियाणांची पेरणी करवी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बियाणातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली तरी ती हंगामाच्या अंतिम टप्प्यात लक्षात येते. त्यामुळे वेळही निघून गेलेली असते. यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले तर त्याची खात्रीही असते आणि खर्च कमी होतो.
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. खर्च कमी आणि उत्पादकता अधिक असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस क्षेत्र वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या 60 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचाच पेरा असतो. गतवर्षी काढणीच्या दरम्यानच परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दर्जा ढासळेलेल्या सोयाबीनचे बियाणे होऊच शकत नाही त्यामुळे घरचे बियाणेच हाच उत्तम पर्याय असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावर यांनी सांगितले.
शेती पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता दरवर्षी स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्पादनवाढीसाठी स्पर्धा लागतात. यंदाही हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासंदर्भात अधिकृत बक्षीसांची घोषणा झाली नसली तरी अवघ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती व्हावी यादृष्टीकोनातून कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.