वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Agricultural produce market committee) कार्यकाळ संपून मोठा कालावधी उलटला आहे, असं असताना अन्य काही कारणांनी निवडणूक लांबणीवर पडली. आता मुहूर्त मिळाला असून येत्या ३० एप्रिल रोजी प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी सध्यातरी महाविकास आघाडी (MVA) किंवा अन्य कुणाचीही आघाडी होण्याचे स्पष्ट संकेत नसले तरी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. बाजार समित्या काबीज करण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसत आहे.
सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. कॉंग्रेस, राष्ट्रवाद आणि काही प्रमाणात शिवसेनेने आधीपासूनच बाजार समित्यांवर वर्चस्व राखले. मात्र, भाजपाच्या पदरात बाजार समित्यांच्या निवडणुकीत फारसे काही पडले नसल्याचा पुर्वेतिहास आहे. यंदाच्या निवडणूकीत मात्र चमत्कार घडवून दाखवायचा आहे, असे म्हणत भाजपाची नेतेमंडळी कंबर कसून कामाला लागल्याचे दिसत आहे.
बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी सर्व साधारण सेवा सहकारी मतदार संघ, सेवा सहकारी इतर मागासवर्गीय मतदार संघ, सेवा सहकारी शेतकरी मतदार संघ, ग्राम पंचायत सर्व साधारण मतदार संघ आणि व्यापारी अडते मतदार संघात समाविष्ट मतदारच उमेदवारांना मतदान करू शकतात. त्यानुषंगाने जिल्ह्यात एकूण १२ हजार ८८६ मतदार संख्या असून ते येत्या ३० एप्रिलला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्रात नवं सरकार आल्यापासून त्याचे परिणाम ग्रामीण भागात सुध्दा पाहायला मिळत आहेत. अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या कोणत्या पक्षाच्या ताब्यात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातल्या राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर परिणाम होणार असल्याचं चर्चा सुध्दा आहे.