मुंबई : ट्रक चालवत लांब पल्ला गाठताना ड्रायव्हर्संची चांगलीच दमछाक होते. रस्त्याचा अंदाज आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पुरते बारा वाजतात. त्यात लांब पल्ल्याचा प्रवास करताना इंजिन चांगलंच तापतं आणि केबिनमध्ये बसलेल्या चालकांना गाडी चालवताना त्रास होतो. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचं ठरवलं होतं. ड्रायव्हर्सचा थकवा कमी करण्यासाटठी सर्व ट्रक वातानुकूलित करण्याचा विडा त्यांनी उचलला होता. त्यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश येईल असं म्हणायला हरकत नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत सांगितलं आहे की, “1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या एन२ आणि एन३ श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवली आहे. तसेच एअर कंडिशनिंग सिस्टम असलेल्या केबिनची चाचणी भारतीय मानक संस्थेच्या नियमानुसार असावी.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की, ‘भारतातील ट्रक ड्रायव्हर्स हा सार्वजनिक वाहतुकीतील सर्वाधिक दुर्लक्षित विभाग आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ट्रक चालक काम करत असतात. त्यांच्यावर देशातील जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्याची जबाबदारी असते. अनेकदा ठरलेल्या तासांपेक्षा जास्त काळ काम करतात. यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होते. यामुळे अनेकदा महामार्गावर रस्ते अपघात होऊ शकतात.’ एन2 कॅटेगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 3.5 टनाहून जास्त आणि 12 टनापेक्षा कमी असतं. तर एन3 कॅटगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 12 टनापेक्षा अधिक असते.
केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. “ट्रक चालकांचं काम आणि प्रवास सुखकर करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तसेच त्यांना लांबच्या पल्ल्यात थकवा जाणवणार नाही.” एसी केबिनमुळे व्यवसायिक वाहनांच्या किंमतीत वाढ होईल असं सांगण्यात आहे. या निर्णयावर काही जणांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या होत्या. पण याकडे आता सकारात्मक बदल म्हणून पाहणंही तितकंच गरजेचं आहे.