नवी दिल्ली | 13 March 2024 : देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादन कंपनी OLA Electric लवकरच बाजारात IPO घेऊन येत आहे. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी ठरेल. पण त्यापूर्वी ओला पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहे. कंपनी दुचाकीनंतर तीनचाकी उत्पादनात उडी घेणार आहे. ऑटो ई-रिक्षेवर कंपनीने फोकस केला आहे. मीडियातील वृत्तानुसार, ओला आता इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर घेऊन येत आहे. या कंपनीने य तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनाचं नाव पण निश्चित केले आहे.
ओ राही, ओ राही
ईटीच्या वृत्तानुसार, ओला कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनाचे नाव राही (Rahi) असे निश्चित केले आहे. हे तीनचाकी वाहन येत्या काही महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. या नवीन इलेक्ट्रिक वाहनाचा बाजारात मुख्यतः महिंद्रा ट्रियो, पियाजियो एप आणि बजाज आरई यासारख्या मॉडलशी सामना होईल. कंपनी ई ऑटो रिक्षावर अनेक वर्षांपासून काम करत आहे.
तीन चाकींची वाढली मागणी
सरकारच्या वाहन पोर्टलनुसार, वर्ष 2023 मध्ये एकूण 5,80,000 थ्री-व्हिलर्सची नोंदणी करण्यात आली आहे. वर्ष 2022 च्या तुलनेत यामध्ये जवळपास 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्ष 2023 मध्ये देशात एकूण विक्री झालेल्या तीनचाकी वाहनांत (पेट्रोल आणि सीएनजी) एकट्या इलेक्ट्रिक तीनचाकींचा वाटा 50 टक्क्यांवर आला आहे. लहान-मोठ्या शहरात इलेक्ट्रिक तीनचाकींची मागणी जोमात आहे.
किंमती तरी काय
सध्या बाजारात इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षांची किंमत जवळपास 2 ते 3.5 लाखांदरम्यान आहे. त्यामुळे ओला आता त्यांच्या नवीन ई-रिक्षाची किंमत किती ठरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकीतील दादा ठरला आहे. कंपनी दरमहा 30 हजारांहून अधिकच्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. . सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कंपनीच 40 टक्के बाजारावर कब्जा आहे. कंपनी लवकरच तिचा आयपीओ पण बाजारात आणत आहे.
देशातील सर्वात मोठी गीगा फॅक्टरी
OLA Electric देशातील सर्वात मोठी बॅटरी सेल गीगाफॅक्टरी उभारत आहे. तामिळनाडू येथील कृष्णागिरी जिल्ह्यात हा कारखाना उभारण्यात येत आहे. कारखान्यात उत्पादन सुरु झाल्यानंतर तो देशातील सर्वात मोठा बॅटरी सेल निर्मिती कारखाना ठरेल. या कारखान्यात प्रतिवर्षी 10 गीगावॅट तास बॅटरी सेलचे उत्पादन करण्यात येणार आहे.