मुंबई : FY2021-2022 जवळ येत असताना, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, भारतातील ऑटोमोबाईल उत्पादक त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवतील. काही दिवसांपूर्वी, टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या प्रवासी वाहनांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मर्सिडीज बेंझ (Mercedes-Benz) पुढील महिन्यात आपल्या कारच्या किंमती 50,000 ते 5 लाख रुपयांनी वाढवणार आहे. ही वाढ विविध मॉडेल्सवर अवलंबून असेल. ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) पुढील शॉपिंग विंडोमध्ये आपल्या स्कूटर रेंजच्या किमती वाढवणार असल्याचेही जाहीर केले आहे. सध्याच्या (ओपन) विंडोमध्ये स्कूटर खरेदी करणाऱ्या लोकांना या दरवाढीतून सूट दिली जाईल.
काही रिपोर्टमध्ये अपेक्षा व्यक्त केली आहे की, इतर कार उत्पादक आणि दुचाकी उत्पादक कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती लवकरच वाढवतील, शक्यतो एप्रिल 2022 मध्येच या किंमती वाढवल्या जातील. कच्च्या मालाच्या (रबर, पोलाद, इतर धातू) सतत वाढणाऱ्या किमतींमुळे वाहनांच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, सेमीकंडक्टरचा तुटवडा कायम आहे, ज्यामुळे उत्पादकांवर मोठा भार पडत आहे. रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक सेमीकंडक्टर चिप पुरवठ्यासाठी मोठ्या समस्या निर्माण केल्या आहेत.
बहुतेक वाहन उत्पादकांनी जानेवारी 2022 मध्ये दरवाढीची घोषणा केली होती. पुढील तिमाहीत आणखी एक किंमत वाढ अनेक संभाव्य खरेदीदारांना वाहनांच्या खरेदीपासून परावृत्त करु शकते, परिणामी विक्रीमध्ये आणखी एक घट होऊ शकते. 2021 मध्ये जवळजवळ प्रत्येक वाहन उत्पादकाने वर्षभरात किमान दोनदा आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. आगामी दरवाढ ही या वर्षातली दुसरी दरवाढ असेल. नवीन वाहनांच्या वाढत्या किमतींमुळे जुन्या वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. वापरलेल्या कारच्या बाजारपेठेत गेल्या वर्षी लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. यंदादेखील ही वाढ लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, नवीन वाहनांची मागणी कमी झालेली नाही, नवीन लाँच केलेल्या मॉडेल्सना ग्राहकांची पसंती आहे.
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लवकरच इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. EVs मध्ये ICE कारपेक्षा अधिक प्रमाणात सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. देशभरात ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये सतत सुधारणा होत असतानाही सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक वाहने मुख्य प्रवाहात येण्यास बराच वेळ लागेल, अशी अपेक्षा आहे.
इतर बातम्या
अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील