नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : फेरारी म्हटलं की वेग, गती. ही कार अनेकांच्या मनात घर करुन आहे. पण तिची किंमत ऐकून श्रीमंतांच्या पण मनात चलबिचल होते. जगातील महागड्या कार उत्पादन कंपनीत फेरारी पण आहे. फेरारी ही इटालियन स्पोर्ट्स कार उत्पादन करणारी आणि फॉर्म्युला वनमधील रेसिंग टीम आहे. एन्झो फेरारी यांनी ही भन्नाट आयडिया लढवली. वेगावर आरुढ होण्यासाठी या कारची निर्मिती करण्यात येते. आता फेरारीने खास ऑफर आणली आहे. क्रिप्टो करन्सीत ही कार ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. क्रिप्टो चलनाविषयी जगभरातील सरकारं साशंक नजरेनेच पाहतात. पण फेरारीने क्रिप्टो चलन स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
श्रीमंतांच्या विनंतीला दिला मान
जगभरातील विशेषतः अमेरिकेतील गर्भश्रीमंतांनी क्रिप्टो करन्सी स्वीकारण्याची गळ कंपनीला केली होती. Ferrari RACE.MI ने ही मागणी मान्य केली. त्यामुळे ही आलिशान स्पोर्ट कार क्रिप्टो करन्सीत खरेदी करता येईल. लवकरची युरोपमधील देशात पण ही ऑफर सुरु करण्यात येत आहे. पण उर्वरीत जगात ही कार क्रिप्टोत खरेदी करण्याची कोणती पण ऑफर सुरु करण्यात आलेली नाही.
अनेक कंपन्या क्रिप्टोशी फटकून
जगभरातील मोठ्या ब्लू-चिप कंपन्या क्रिप्टोशी फटकून वागतात. या चलनाची विश्वाहर्ता अजूनही कमी आहे. त्यामुळे त्याचा व्यवहारात फार कमी वापर होतो. बिटकॉईनसह इतर अनेक क्रिप्टोचलन बेभरवशाचे आहेत. त्यात प्रचंड अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे व्यापारासाठी हे चलन अव्यवहार्य जाणवते. अनेक कंपन्यांनी क्रिप्टो स्वीकारण्यास त्यामुळेच नकार दिला आहे.
टेस्लाचा पुढाकार
फेरारीपूर्वी टेस्लाने हा प्रयोग केला आहे. एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने 2021 मध्ये बिटकॉईनमध्ये पेमेंट स्वीकारण्यास तयारी दर्शवली होती. हे सर्वात मोठे क्रिप्टो कॉईन आहे. हा प्रयोग त्यावेळी टीकेचा आणि कौतुकाचा विषय ठरला होता. भारतात अनेक जण क्रिप्टो चलनात गुंतवणूक करत आहेत. अनेक जण त्याआधारे अचानकच श्रीमंत झाले आहे. पण हे चलन अजून धोक्याचे असल्याचे केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अनेकांचे म्हणणे आहे.