नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : रॉयल एनफिल्डची दमदार हिमालयन 450 ही बाईक महाग होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या बाईकच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दहा दिवसांत ग्राहकांना सध्याच्या किंमतीत ही बाईक खरेदी करता येणार आहे. गेल्या महिन्यात मोटोवर्समध्ये हिमालयन 450 लाँच केली होती. या पॉवर बाईकची किंमत 2.69 लाख रुपयांनी सुरु झाली. बेस मॉडेल ब्राऊनसाठी ही किंमत होती. तर टॉप-ऑफ-द-लाइन समिट ट्रिम हेनले ब्लॅकसाठी 2.79 लाख रुपये तर कॉमेट व्हाईट पेंट स्कीमसाठी ही किंमत 2.84 लाख रुपयापर्यंत जाते.
दमदार इंजिन
हिमालयन 450 ला ऊर्जा देण्यासाठी 450cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. यामध्ये 40 Nm का पीक टॉर्क आणि 40 hp ऊर्जा मिळते. या बाईकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स देण्यात आले आहे. नावाप्रमाणेच ही बाईक ओबडधोबड रस्त्यावर जोरदार अनुभव देणारी आहे. खास करुन डोंगरी भागात ती दमदार कामगिरी बजावत असल्याचा दावा आहे.
फीचर्स तरी काय
नवीन हिमालयन बाईकमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहे. या बाईकमध्ये राईड-बाय-वायर, नेव्हिगेशन आणि मीडिया कंट्रोलसाठी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 4 इंचची TFT स्क्रीन, राईड मोड (इको आणि परफॉर्मेंस) स्विचेबल एबीएस देण्यात आली आहे.
बाईकचे डिझाईन आहे असे
नवीन हिमालयनमध्ये पूर्णपणे नवीन डिझाईन स्टील ट्विन-स्पर फ्रेम देण्यात आली आहे. तर सस्पेंशनसाठी यामध्ये 43 mm यूएसडी फोर्क आणि एक प्रीलोड-एडजस्टेबल मोनोशॉक युनिट देण्यात आले आहे. हे दोन्ही 200 mm ट्रॅव्हल देतात. 230 mm ग्राउंड क्लियरेंससह स्टॉक सीटची उंची 825 mm आहे. ती वाहनधारकांसाठी अनुकूल आहे. ते गरजेच्यावेळी 845 mm पर्यंत वाढवता येते. तर 805 mm कमी करता येते.
1 जानेवारी 2024 रोजीपासून वाढतील किंमती
31 डिसेंबरपूर्वी ही बाईक ऑनलाईन अथवा शोरुममधून बुकिंग केल्यास ग्राहकांना सध्याच्या किंमतीत ती खरेदी करता येईल. तर 1 जानेवारी 2024 रोजीपासून या बाईकची किंमत वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसेल. ग्राहकांनी 1 जानेवारीपूर्वी या बाईकचे बुकिंग केल्यास त्याला रंग बदलाचा पर्याय मिळेल. पण त्याने 1 जानेवारी रोजी अथवा नंतर बुकिंग केल्यास त्याला अधिक रक्कम द्यावी लागेल.