मुंबई : अनेक जण इतकी सफाईदारपणे कार चालवतात की त्यांच्या ड्राइव्हींग स्किलची (Car driving Skills) स्तुती करावी तितकी कमीच असते. जर तुम्हालाही अशीच कार चालवायची असेल किंवा तुम्ही नुकतीच कार चालवायला सुरुवात केली असेल, तर तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही सुरक्षित कार चालवू शकाल. आज आपण कार ड्रायव्हिंगशी संबंधित काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि कार चालवताना उपयोगी पडू शकतात.
तुम्ही जी गाडी चालवणार आहात त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असायला हवी. सर्वप्रथम, तुम्हाला कारच्या गिअर अॅडजस्टमेंटबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे. यासोबतच तुम्हाला क्लच आणि ब्रेक्सचीही पूर्ण माहिती असायला हवी. गाडी शिकत असताना वाहनाचा वेग नेहमी कमी असावा आणि त्यानुसार गाडीचा गिअर शिफ्ट करावा.
कार चालवताना तुम्ही तुमच्या बसण्याच्या स्थितीकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. खरे तर कारमधील तुमची बसण्याची स्थिती योग्य असेल तर तुम्ही गाडी योग्य प्रकारे चालवू शकाल. यासाठी तुम्ही तुमची बसण्याची स्थिती नेहमी अशा प्रकारे ठेवावी की तुमच्या पाठीवर, गुडघे आणि खांद्यांवर जास्त ताण किंवा दबाव येणार नाही. तसेच, कारमध्ये बसताना तुमचे पाय ब्रेक आणि क्लचपर्यंत आरामात पोहोचू शकतील, जेणेकरून ते वापरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, हे लक्षात ठेवा.
रस्त्यावरून गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवावी. त्यामुळे गाडी चालवण्यापूर्वी रीअर व्ह्यू मिरर आणि साईड मिरर त्यानुसार अॅडजस्ट करा जेणेकरून तुम्हाला रियर व्ह्यू आणि साइड व्ह्यू सहज पाहता येईल. लक्षात ठेवा की जास्त रहदारीच्या ठिकाणी काळजीपूर्वक वाहन चालवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.
बरेचदा लोकं गाडी चालवायला शिकल्याबरोबर रस्त्यावर वेगाने गाडी चालवायला लागतात. अतिवेगाने वाहन चालवणे किती धोकादायक आहे हे ते विसरतात. त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन भरधाव वेगाने वाहन चालवू नका. गाडी चालवण्याचा तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास येईपर्यंत गाडीचा वेग कमी ठेवा.
वाहन चालवताना, नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्टीयरिंगवर पूर्ण नियंत्रण आहे आणि स्टीयरिंग नेहमी 9×3 स्थितीत धरा. स्टीयरिंग व्हीलवर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल तर तुम्ही वाहन कुठेही नेऊ शकता.
याशिवाय गियर्स बदलताना काळजी घ्या. गियर बदलल्यानंतर तुमचा हात गियरवर सोडू नका, तो पुन्हा स्टिअरिंगवर आणा. कारण तुमचा एक हात गियरवर राहिला तर तुम्ही फक्त एकाच हाताने गाडी चालवत असाल, जे खूप धोकादायक असू शकते.
वाहन चालवताना समोरील वाहनापासून थोडे अंतर ठेवा. कारण अनेक वेळा पुढे जाणारे वाहन अचानक ब्रेक लावते आणि आपण वेळेवर ब्रेक लावू शकलो नाही तर अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नेहमी योग्य अंतर ठेवून वाहन चालवा.
वाहन चालवताना लेन लक्षात ठेवा. कार नेहमी पहिल्या लेनमध्ये चालवा. लोडिंग वाहन दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेनमध्ये चालवावे.
विनाकारण हॉर्न कधीही वाजवू नये. आजूबाजूला आणि वाहनासमोरून चालणाऱ्या लोकांना सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर नेहमीच केला जातो. मात्र कर्कश्य हाॅर्नमुळे लोकांना त्रास होतो त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजवणे टाळावे.
वाहन चालवताना मन शांत असावे. कारण तुमच्या मनात अशांतता असेल तर छोटीशी चूकही तुमचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू शकते. त्यामुळे वाहन चालवताना नेहमी शांत राहा.