नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : सध्या पेट्रोल आणि डीझेलचे भाव वाढल्याने इलेक्ट्रीक कारची हवा निर्माण झाली आहे. सध्या ईलेक्ट्रीक कार प्रचंड महागड्या असल्याने त्यांच्या वाट्याला सर्वसामान्य ग्राहक जात नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यातच येत्या काही वर्षांत भारतातील ईलेक्ट्रीक कार स्वस्त होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सतोवाच केले आहे. त्यात आता एवघ्या दहा मिनिटाच्या चार्जिंगमध्ये 400 किमी धावणाऱ्या बॅटरीचा शोध लावण्यात यश आले आहे. त्यामुळे ई-कारला चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे.
इलेक्ट्रीक कार पुढचे भविष्य असल्याचे म्हटले जात आहे. टेस्लासारखे ई-कार ब्रॅंड देशात दाखल होणार आहेत. इलेक्ट्रीक कारच्या बॅटरींना चार्जिंगसाठी वेळ लागत असल्यानेही अनेक जण नाक मुरडत असतात. अशात आता जगातील सर्वात मोठी कार बॅटरी निर्माता कंपनीने अवघ्या दहा मिनिटात 400 किमीपर्यंत धावू शकणाऱ्या कार बॅटरीची निर्मिती केल्याचे म्हटले आहे.
चीनच्या कन्टेम्प्ररी टेक्नॉलॉजी लिमिटेड ( CATL ) म्हटले आहे की त्यांची लिथियम-आयन बॅटरी इलेक्ट्रीक कारला नव्या युगात नेणार असून कार ग्राहकांसाठी अनेक रेंजचा पर्याय उपलब्ध केला आहे. ही नवीन लिथियम-आयन बॅटरीची एकाच चार्जमध्ये कारला तब्बल 700 किमी धावण्यास सक्षम करणार असून साल 2023 च्या इ-कार पेक्षा तिची सरासरी 60 टक्के जादा क्षमता आहे.
ब्रॅंड न्यू सुपरकंडक्टींग इलेक्ट्रोलाईट फॉर्मूलामुळे बॅटरीची क्षमता वाढविल्याने चार्जिंगची वेळ कमी झाला असल्याचे सीएटीएल कंपनीने म्हटले आहे. ईव्ही बॅटरीचे भविष्य उज्वल असून यात नवनवीन तंत्रज्ञान आल्याचे त्याचा इलेक्ट्रीक कारचे उत्पन्न वाढणार असल्याचे सीएटीएलचे मुख्य संशोधक डॉ. वु.काय यांनी म्हटले आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे ग्राहक वाढण्यासाठी हे तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सीएटीएलने तिच्या स्पर्धक कंपन्यापेक्षा 2022 मध्ये सर्वात जास्त लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादन केले असून पुढच्या वर्षी मास प्रोडक्शनला सुरुवात करण्यात येणार आहे. कंपनीने कोणत्या कारच्या कंपनीत ही आधुनिक बॅटरी सर्वप्रथम लावली जाणार आहे हे अजूनही गुपित असून ही कंपनी बीएमडब्ल्यू, होंडा, टेस्ला, टोयोटा, फोक्सवॅगन, डॅमलर एजी आणि वोल्वो कारना बॅटरी पुरविते. जगात गेल्यावर्षी दहा दशलक्ष इलेक्ट्रीक कार विकल्या गेल्या आहेत.