नवी दिल्ली | 26 January 2024 : कोणत्याही डिझेल कारमध्ये पेट्रोल अथवा पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकून ती दामटता येत नाही. त्यामुळे पंपावर इंधन भरताना फ्यूएल टँकवर चिन्ह नसेल तर कर्मचारी तुम्हाला दोनदा तरी कोणतं इंधन भरायचं याची खात्री करतो. तुम्ही जर चुकीची माहिती दिली तर तुमच्या कारचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. कारण चुकीचे इंधन टाकल्यास कारचे इंजिनचे मोठे काम करावे लागते आणि त्यात मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे इंधन भारताना योग्य ती काळजी, खबरदारी घेणे आवश्यक आहे.
केरोसिनवर का नाही धावत कार?
पेट्रोल आणि डिझेलवर कार धावतात. पण रॉकेल, केरोसीनवर त्या धावत नाहीत, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यामागे प्राथमिक कारण हे आहे की, गॅसोलीन झटपट जळते. त्याचे सहज बाष्पीभवन होते. ते लवकर जळते. तर रॉकेल, त्याला मातीचे तेल, मिट्टी का तेल, केरोसीन अशा नावाने ओळखले जाते. त्याला जाळणे सोपे नाही. त्यासाठी जास्त तापमान लागते. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत त्याचे ऊर्जेत रुपांतर करण्यास वेळ लागतो. त्यामुळे कोरोसिनचा वापर ऑटोमोबाईलमध्ये इंधनाच्या रुपात करण्यात येत नाही.
काय आहे Flex Fuel
फ्लेक्स फ्युअल हे खास प्रकारचे तंत्रज्ञान आहे. यामध्ये वाहनांमध्ये 20 टक्के इथेनॉल वापराची सुविधा देते. फ्लेक्स फ्युअल गॅसोलीन(पेट्रोल), मेथनॉल अथवा इथेनॉलचे मिश्रण यामध्ये असते. या वाहनाचे इंजिन विविध प्रकारच्या इंधनाचा वापर करण्यासाठी डिझाईन करण्यात येते. देशात काही दिवसांत हा प्रयोग सुरु होईल.
डिझेल इंजिनमध्ये पेट्रोल टाकल्यास?
चुकीचे इंधन टाकल्याचा मोठा फटका बसतो. पण त्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये काय फरक असतो ते समजून घ्या. ऑटोमोबाईल्सच्या काही रिपोर्ट्सनुसार, डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकल्यास ते डिझेलमध्ये मिसळते. नंतर ते सॉल्व्हेंट म्हणून काम करते. त्याचा विपरित परिणाम कारच्या इंजिनवर दिसतो. डिझेल इतर भागांसाठी वंगण म्हणून कार्य करते. पण पेट्रोल टाकल्याने या सर्वच भागात घर्षण सुरु होते. त्यामुळे इंजिन जाम होऊ शकते. इंजिन खराब होण्याचा धोका असतो. त्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येतो.
पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्यास?
पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्यास ही चूक मोठी महागात पडते. अवघ्या काही मिनिटात इंजिन जाम होते. कार पुढे धकतच नाही. तुम्ही जर कार सुरु करण्याचा प्रयत्न केला तर इंजिनाचे मोठे नुकसान होते. डिझेल पेट्रोलप्रमाणे स्पार्क देत नसल्याने कार सुरुच होत नाही. इंजिन कामातून जाते. हे डिझेल सर्वच भागात पोहचले तर कार टो करुन मॅकेनिककडे नेण्याशिवाय पर्याय नसतो. इंजिन दुरुस्तीसाठी कालावधी लागतोच पण खर्चही मोठा येतो.