दिल्ली : जगातील सर्वात मोठी दुचाकी ( Two Wheeler Company ) निर्मिती करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्प ( Hero Motocorp ) हीने येत्या तीन जुलैपासून आपल्या मोटरसायकली आणि स्कूटरच्या एक्स-शोरुम ( Ex Showroom Price ) किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ जवळपास 1.5 टक्के असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच चाट पडणार आहे. हीरो मोटोकॉर्पने याच वर्षी एप्रिल महिन्यात OBD2 मानदंडात बदल केल्यानंतर दुचाकीच्या किंमतीत वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कंपनीने दरवाढ घोषीत केल्याने वाढत्या महागाईत आणखीन फटका बसणार आहे.
हीरो मोटोकॉर्प कंपनीने एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मोटरसायकल आणि स्कूटरच्या किंमती होऊ घातलेली वाढ ही कंपनीच्या मूल्य समीक्षा धोरणाचा भाग आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की इनपुट खर्चात झालेल्या वाढीमुळे किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांआधीच दुचाकीच्या किंमतीत वाढ करण्यात आली असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.
अलिकडेच हीरो मोटोकॉर्प कंपनीने एंट्री लेव्हल कम्प्युटर सेगमेंटमध्ये पॅशन प्लस ही मोटरसायकल लॉंच केली आहे. त्याचवेळी कंपनीने Xtreme 160 4V ला आपल्या नवीन प्रिमियम कंम्प्युटर मोटरसायकलच्या रुपात सादर केले आहे. ही एक नवीन प्रिमियम बाईक आहे.
दुचाकी वाहन निर्माता कंपनी यावर्षी अनेक नवीन मॉडेलचे लॉंचिंग करणार आहे. यात काही बाईक अशा आहेत ज्यांची ग्राहकांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा आहे. या नवीन मॉडेलमध्ये करिझ्मा XMR 210 या बाईकचा देखील समावेश आहे. हीरो कंपनी निर्मित हार्ले-डेविडसन X440 सर्वात आधी लॉंच होणार आहे. दुचाकीच्या किंमतीत वाढ जाहीर होण्याच्या दिवशीच म्हणजे 3 जुलै रोजीच हीरो कंपनीची हार्ले डेविडसन बाईक लॉंच करण्यात येणार आहे.