मुंबई : होंडा कार कंपनीने नुकतंच आपल्या सेडान कार होंडा सिटीमध्ये बदल करत लाँच केली आहे. होंडा सिटीबाबत भारतीय कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कंपनीने होंडा सिटी फेसलिफ्ट आणि सिटी e:HEV भारतात लाँच केली आहे. तसं पाहिलं तर यात फार काही मोठा बदल नाही. पण छोटे छोटे बदल काळानुरूप करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात सेडान गाड्यांना हवी तशी मागणी नाही. त्यामुळे त्यात बदल करणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे कंपनीने गाडीचा चेहरा जरी तोच असला तरी फेसलिफ्ट वर्जनमध्ये पाच बदल केले आहेत. चला जाणून घेऊयात यात कोणते बदल करण्यात आले आहेत.
नव्या फेसलिफ्ट वर्जनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही गाडी अधिक आकर्षक दिसते. पुढच्या भागात लावलेल्या ग्रिलमुळे गाडीला स्पोर्टी लूक येतो. तसेच फ्रंट बंपरही नव्याने डिझाईन करण्यात आला आहे. यावर कार्बन व्रॅप्ड लोअर मोल्डिंग केली आहे. तसेच फोग लँपसह मागच्या बाजूच्या बंपरमध्ये बदल दिसून येत आहे. त्याचबरोबर 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर ओब्सडियन ब्लू पर्ल रंगाचा पर्याय उपलब्ध आहे.
काळानुरूप होंडा सिटीमध्ये नव्या वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे. नव्या फीचर्समुळे कारप्रेमींना त्याचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये अँम्बियन्ट लायटिंग, रेन सेन्सिंग वायपर, वायरलेस अँड्राईड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे. तसेच वायरलेस चार्जरची सुविधा देण्यात आली आहे.
होंडा सिटीमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टम देण्यात आली आहे. अपघात होण्यापूर्वीच मिटीगेशन ब्रेकिंग सिस्टम, एडाप्टिव क्रुझ कंट्रोल, रोड डिपार्चर मिटीगेशन सिस्टम, लेन कीप असिस्ट सिस्टम, कार नोटीफिकेशन आणि ऑटो हाय बिमची सुविधा देण्यात आली आहे.
होंडा सिटीच्या नव्या व्हेरियंटमध्ये फीचर्सनुसार किमतीतही बदल दिसून येतो. नव्या ट्रिममध्ये होंडा सिटी V, VX आणि ZX व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 2023 होंडा सिटीची किंमत 11.49 लाखापासून सुरु होते आणि 14.72 लाखांच्या घरात जाते. या दोन्ही किमती एक्स शोरुम आहेत.
नव्या होंडा सिटीमध्ये 1.5L i-VTEC इंजिन आहे. हे इंजिन 119 बीएचपी 6600 आरपीएमवर आणि 4300 आरपीएमवर 145 एनएम टॉर्क जनरेट करते. ही गाडी 6 स्पीड मॅन्युअर गिअरबॉक्ससह येते. यात 7 स्टेप्स सीव्हीटीचाही पर्याय आहे. या दोन्ही गाड्यांचा मायलेज 17.8 किमी आमि 18.4 किमी इतका असल्याचा दावा कंपनीने केला आहे.