आता पुण्यात वाजणार ह्युंदाई गाड्यांचा डंका, कंपनीने उचललं असं पाऊल

| Updated on: Mar 14, 2023 | 1:58 PM

ह्युंदाई कंपनीच्या एका निर्णयामुळे पुण्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ह्युंदाईने जनरल मोटर्ससोबत करार केला आहे.

आता पुण्यात वाजणार ह्युंदाई गाड्यांचा डंका, कंपनीने उचललं असं पाऊल
ह्युंदाई कंपनीच्या निर्णयामुळे पुण्यात रोजगाराच्या नव्या संधी, नेमकं काय झालं ते वाचा
Image Credit source: Hyundai
Follow us on

पुणे : साउथ कोरियन कंपनी ह्युंदाईला पुण्याची भुरळ पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी या ठिकाणी जागा शोधत होती. अखेर त्यांचा हा प्रश्न सुटला असून आता पुण्यातील तळेगाव परिसरात प्लांट सुरु होणार आहे. जनरल मोटर्सच्या संभावित प्लांट अधिग्रहणावर स्वाक्षरी केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे या प्लांटमध्ये ह्युंदाईच्या कार तयार होणार आहेत. तसेच रोजगाराच्या नव्या संधी देखील मिळणार आहेत. ह्युंदाईने दिलेल्या माहितीनुसार, करारानुसार यात जमीन, प्लांट आणि मॅन्युफॅक्च्युरिंग मशिनींचा समावेश आहे.

ह्युंदाई दक्षिण कोरियन कंपनी असून भारतात गेल्या अनेक वर्षांपासून गाड्यांची विक्री करत आहे. भारतात एकूण 12 उत्पादनं विकली जात आहे. यात ग्रँड आय 10 नियोस, आय 20, आय 20 एन लाइन, ऑरा, वेन्यू, वेन्यू एन लाइन, वर्ना, क्रेटा, अल्कायझार, ट्यूशॉ, कोना इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

जनरल मोटर्स ही अमेरिकन वाहन निर्माता कंपनी असून 1918 पासून आहे. 1928 मध्ये मुंबई प्लांट सुरु होता. मात्र 1958 साली भारतातून काढता पाय घेतला. त्यानंतर 22 वर्षानंतर 1995 मध्ये भारतात पुनरागमन केलं. 2015 पासून कंपनी तोट्यात असल्याचं काही मीडिया रिपोर्टमधून पुढे आलं आहे. त्यामुळे कंपनीला हा प्लांट बंद करायचा होता. 2017 पासून कंपनीने या ठिकाणी कार निर्मिती हळूहळू बंद केली.

जनरल मोटर्सचा हा प्लांट वर्ष 2020 पासून बंद होता. जनरल मोटर्स या ठिकाणी असेंब्लिंग आणि पॉवरट्रेन प्रोडक्शन फॅसिलिटीचा त्याचा वापर करत होती. ह्युंदाई कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित अधिग्रहण मालमत्ता खरेदी आणि आधीच्या अटींची पूर्तात करणे यासह निगडीत आहे. त्याचबरोबर सरकारी अधिकारी आणि अधिग्रहण संबंधित सर्व भागधारकांकडून नियामक मान्यता प्राप्त करणे याच्या आधीन आहे.

जनरल मोटर्सने 2020 साली प्लांट बंद केल्यानंतर अशाच एका कंपनीच्या शोधात होती. जेणेकरून या प्लांटचा योग्य प्रकारे वापर केला जाईल. आता ह्युंदाई आणि जनरल मोटर्स यांच्यात करार झाल्याने हा प्लांट पुन्हा एकदा सुरु होणार आहे.

गेल्या वर्षी हा करार होता होता राहिला. या प्लांटसाठी ग्रेट वॉल मोटर, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपन्या स्पर्धेत होत्या. या प्लांटमधून वर्षाला 1.30 लाखाहून अधिक गाड्या निर्मिती करण्याची ताकद आहे. ह्युंदाई या प्लांटमधून इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीला प्राधान्य देईल. ह्युंदाई सध्या कोना इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 या इलेक्ट्रिक गाड्यांची भारतात विक्री करते.