ह्युंदाईने (Hyundai) भारतीय कार बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार (Electric car) लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. हे नवीन प्रोडक्ट पुढील महिन्यात बाजारात येउ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या ह्युंदाईने भारतात वेन्यूचे फेसलिफ्ट व्हर्जन आणले आहे. ह्युंदाई या वर्षी आपली आयओनिक 5 इलेक्ट्रिक व्हेकलला लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यानंतर ते एक बजेट इलेक्ट्रिक एसयुव्ही (SUV) कारलाही लाँच करु शकतात, अशी माहिती आहे. गाडीवाडी नावाच्या वेबसाइटकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई काही नवीन कार्सवर काम करीत असून ज्यात, स्मॉल इलेक्ट्रिक व्हेकलचा समावेश आहे. या कारला लवकरच भारतीय बाजारात सादर केले जाण्याची शक्यता आहे. ही कार चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग रेंज देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ह्यूंदाईने 2028 पर्यंत सहा नवीन इलेक्ट्रिक कार्सला भारतात लाँच करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनीने 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते. ग्लोबल वॉर्मिंगला लक्षात घेउन अनेक कंपन्या इलेक्ट्रिक व्हेकलकडे वळाल्या आहेत. इलेक्ट्रिक बाजारातील स्पर्धेमुळे याचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार आहे.
टाटा मोटर्सची टिगोर ईव्ही पहिल्यापासून बजेट सेगमेंटमध्ये आहे. ही कार चांगल्या ड्रायव्हिंग रेंजशिवाय चांगला लूक, आकर्षक इंटीरियरसह उपलब्ध आहे. सोबत टाटा भारतीय इलेक्ट्रिक बाजारात सर्वाधिक ईव्ही युनिट्स विक्री करणारी कंपनी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलच्या सेगमेंटमध्ये टाटाचा फार गतीने विस्तार झालेला दिसून येतो. टाटा मोटर्स, एमजी आणि बीवाईडी सारख्या अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक व्हेकल भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.
ह्युंदाईच्या पार्श्वभूमीवर टाटादेखील एक स्मॉल एसयुव्ही कारवर काम करीत असल्याची माहिती असून याबाबत वेबसाइटवर माहिती आलेली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी टाटा पंचला ईव्हीमध्ये तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. परंतु ही कधी लाँच होणार याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. टाटा पंच पेट्रोल व्हर्जनमध्ये पहिल्यापासून भारतीय बाजारात उपलब्ध आहे. ही सर्वाधिक बजेट एसयुव्ही कार ठरली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये (एक्सशोरुम) आहे. पुढील काळात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक नवीन आणि बजेट कार बघायला मिळणार आहेत.