मुंबई- भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकींना मागणी आहे. त्यामुळे ऑटो कंपन्या ग्राहकांची मागणी पाहता एकापेक्षा एक अशा सरस बाइक लाँच करतात. तरुणांमध्ये तर स्पोर्ट बाइकची जबरदस्त क्रेझ आहे. या गाड्यांची किंमत जास्त असली तरी आपल्याकडे स्पोर्ट बाइक असावी असा अट्टाहास असतो. पण काही स्पोर्ट्स बाइकची किंमत आपल्या खिशाला परवडणारी देखील असते. पण निवड योग्य असणं गरजेचं आहे. जर तुम्हीही स्पोर्ट्स बाइक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासाठी आमच्याकडे केटीएम इंडियाची स्वस्त आणि मस्त सुपर स्पोर्ट्स बाइक आरसी 125 आहे. ट्रॅक रायडिंगसाठी ही जबरदस्त बाइक आहे. दुसरीकडे भारतीय बाजारात सुझुकीची गिक्सर एसएफ 250 इतर स्पोर्ट बाइकशी स्पर्धा करते. कंपनीने नुकतंच या बाइकमध्ये अपडेट केले आहेत. आज आम्ही KTM RC 125 आणि Suzuki Gixxer SF 250 या दोन बाइकबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. यामुळे तुम्हाला गाडीची निवड करणं सोपं जाईल.
केटीएम आरसी 125 आणि सुझुकी गिक्सर एसएफ 250 या दोन्ही स्पोर्ट्स बाइक आहेत.या दोन्ही बाइकचा लूक एकदम जबरदस्त आहे. आरसी 125 ही आरसी 390 चं छोटं वर्जन आहे, असंच म्हणावं लागेल. तर गिक्सर एसएफ 250 गिक्सर एसएफसारखीच दिसते. दोन्ही गाड्यांमध्ये एलसीडी डिस्प्ले, एलईडी टेल लँप, टर्न इंडिकेटर आणि सुपरमोटो एबीएस आहे. गिक्सर एसएफ 250 मध्ये नुकतंच अपडेट केलं होतं. यात ब्लूटूथसह डिजिटल कंसोल, सुझुकी इजी स्टार्ट सिस्टम आणि एलईडी लँप आहेत.
भारतीय बाजारात केटीएम आरसी 125 किंमत 1.87 लाख रुपये, तर सुझुकी गिक्सर एसएफ 250 ची किंमत 1.93 लाख रुपये इतकी आहे. सुझुकी गिक्सर एसएफसाठी 9600 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.
आरसी 125 मध्ये 124.99 सीसी, लिक्विड कूल इंजिन आहे. हे इंजिन 14.69 बीएचपी आणि 12 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गियरबॉक्सशी जोडलेलं आहे. दुसरीकडे, गिक्सर एसएफ 250 मध्ये 249 सीसी ऑईल कूल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 26.13 बीएचपी आणि 22 एनएम टॉर्क जनरेट करते. यातही 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.