मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) 2021 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 69 टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद केली आहे. कार उत्पादक कंपनीने मार्च 2022 मध्ये 4721 युनिट्सची विक्री केली आहे. कोविड-19 व्हेरिएण्ट चा प्रभाव आणि जगभरात सुरू असलेल्या सेमीकंडक्टर चिप तुटवड्याच्या कारणास्तव पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामांचा कंपनीला मोठा फटका बसला आहे. तरीदेखील कंपनीने विक्रीत वाढ नोंदवली आहे. एमजी मोटर इंडियाला अॅस्टर (MG Astor), हेक्टर (MG Hector), हेक्टर प्लस, ग्लॉस्टर आणि ऑल-न्यू झेडएस ईव्हीसह त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओसाठी चौकशी व बुकिंग्जमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कार उत्पादक कंपनी जगभरात सुरू असलेली खंडित पुरवठा पाहता आपले उत्पादन सुरळीत ठेवण्यासोबत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ऑल-न्यू झेडएस ईव्हीला मार्चमधील 1500 हून अधिक बुकिंग्जसह ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ऑल-न्यू झेडएस ईव्हीमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी 50.3 केडब्ल्यूएच बॅटरीसह प्रगत तंत्रज्ञान आहे. ही वेहिकल सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज देते. एमजी ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासोबत भारतामध्ये शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टीकोनासह इलेक्ट्रिक मोबिलिटी अवलंबता वाढवण्याच्या दिशेने पुढाकार घेत आहे.
टाटा मोटर्सने मार्च महिन्यातही विक्रीच्या बाबतीत मोठी कामगिरी केली आहे. मार्च अखेरपर्यंत, कंपनीने 42,295 युनिट्सची विक्री केली आहे, तर कंपनीने गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात म्हणजेच मार्च 2021 मध्ये 29,655 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने यंदा 43 टक्के वाढ नोंदवली आहे. टाटा मोटर्सने फेब्रुवारी 2022 मध्ये 39,980 युनिट्स कार विकल्या होत्या. भारतीय बाजारात वाहन निर्मात्या कंपनीने महिंद्रा, किया, टोयोटा, एमजी तसेच स्कोडासह इतर अनेक ब्रँड्सना मागे टाकले आहे. देशात दुसरे स्थान ह्युंडईने मिळवले आहे, ह्युंडईने 23005 युनिट्सची विक्री केली आहे.
टाटा मोटर्सचा बाजारातील हिस्सा 13.2 टक्के होता. ही कंपनी देशातल्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा नेक्सॉन, टाटा अल्ट्रॉझ, टाटा पंच, टियागो, हॅरियर आणि सफारी या काही कारसह चांगली कामगिरी करत आहे. टाटा पंच ही एक छोटी SUV कार आहे आणि या कारची सुरुवातीची किंमत खूपच कमी असल्याने ती तिच्या सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या कारने गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत दणक्यात एंट्री घेतली होती.
एमजी झेडएस ईव्ही प्रमाणे टाटाच्या Tigor EV आणि Nexon EV या दोन इलेक्ट्रिक गाड्यांना भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. 2021 मध्ये, टाटाने अपडेटेड टिगॉर ईव्ही सादर केली, तर नेक्सॉन ईव्ही कार सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार आहे. ही मोठी रेंज देणारी एसयूव्ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 400 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच, कंपनी यामध्ये एक मोठा बॅटरी बॅकअप देण्याचा विचार करत आहे, ज्यानंतर कारला अजून चांगली ड्रायव्हिंग रेंज मिळेल. टाटा मोटर्स कंपनी सध्या तीन EV प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यामध्ये एक डेडीकेटेड स्केटबोर्ड देखील आहे.
इतर बातम्या
कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार
भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ
नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स