नवी दिल्ली | 15 March 2024 : भारतात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये कार चोरीच्या घटनांमध्ये दुप्पटीहून अधिकची वाढ झाली. दुचाकी चोरीच्या घटना तर चारचाकी चोरीच्या घटनांपेक्षा नऊ पटीहून अधिक आहे. भारताची राजधानी दिल्लीतील वाहन चोरीची आकडेवारी देशात सर्वाधिक आहे. दिल्लीत सर्वाधिक वाहनांची चोरी झालेली आहे. सर्वाधिक वाहन चोरीच्या यादीत राष्ट्रीय राजधानी 2023 मध्ये सर्वात पुढे आहे. गेल्या वर्षात चोरी जाणाऱ्या वाहनांच्या एकूण संख्येत दिल्लीचा वाटा 37% इतका आहे. दिल्लीत प्रत्येक 12 मिनिटाला एक वाहन चोरी होते.
ही कार सर्वात आवडीची
2023 मधील वाहन चोरीच्या अहवालानुसार, मारुती सुझुकीची WagonR भारतात सर्वाधिक चोरी होणारी कर आहे. कार चोरी होण्यात या कारने मारुतीच्याच स्विफ्ट आणि डिझायर या कार्सना मागे सोडले आहे. त्यानतंर चोरी होणाऱ्या कारच्या यादीत Hyundai ची Grand i10, Santro, Creta आणि Honda City या कारचा क्रमांक लागतो.
दुचाकी चोरी तर सोप्प काम
भारतात वाहन चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाईक चोरी करणे जणू एकदम सोप्प काम झाले आहे. बाईक चोरीची आकडेवारी कार चोरीपेक्षा नऊ पट अधिक आहे. गेल्या वर्षभरात देशात चोरांनी Honda च्या Splendor दुचाकीवर सर्वाधिक हात साफ केला. त्यानंतर
Honda Activa, TVS Apache आणि Royal Enfield Classic 350 या चोरांच्या हिटलिस्टवर आहेत. या दुचाकी तुमच्याकडे असतील तर लक्ष ठेवा आणि सतर्क राहा.
जादा दाम हेच कारण
Hero CD Deluxe, Hero HF Deluxe, Hero Splendor आणि Hero Splendor Plus या चोरीच्या दुचाकींना चांगली मागणी आहेच. पण सेकंड हँड, चोरीच्या दुचाकींसाठी ग्रामीण भागात जादा दाम मोजण्यात येतात. त्यांचे स्पेअर पार्ट्स पण चांगले दाम देत असल्याचे चोरट्यांचे म्हणणे असल्याचे गुरग्राम पोलिसांच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे.
या रंगावर चोरटे फिदा
या रिपोर्टनुसार, चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या कार सर्वाधिक चोरी केल्या आहेत. पांढरा रंग हा चोरट्याचा फेव्हरेट आहे. त्यामागे अपघात कमी होण्याचे मुख्य कारण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रात्री पांढरी कार लवकर लक्षात येत असल्याचा चोरट्यांचा दावा आहे. त्यामुळे ही कार हातोहात विकल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.