मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : महामार्गांवरून प्रवास करताना आपण टोल टॅक्स भरून प्रवास करतो. अनेकदा टोल नाक्यावर मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इप्सित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. पण हा टोल टॅक्स आकारला जातो. त्याचे नियम काय आहेत? हा टोल टॅक्स का आकारला जातो? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळतील. टोल टॅक्सबाबतची नियमावली काय आहे? याचा आढावा घेऊयात…
राष्ट्रीय महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी टोलनाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. अशातच जर त्या टोल नाक्यावर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबायला लागू नये, असं नियम सांगतो. जर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबायला लागलं तर तुम्ही टोल ने देता तिथून जाऊ शकता. टोल नाक्यावर 100 मीटरहून अधिकची रांग असता कामा नये, असा नियम आहे.
टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी लेन केलेल्या असतात. या प्रत्येक लेनमध्ये सहापेक्षा अधिक वाहनं नसावीत. प्रत्येक टोल नाक्यापासून 100 मीटर अंतरावर पिवळ्या रंगाची पट्टी असावी. या शिवाय दोन टोलनाक्यांमध्ये 60 किलोमीटर अंतर असावं, असा नियम आहे. आता यात थोडा बदल करण्यात आला आहे. 60 किलोमीटर अंतराच्या परिघात एकच टोलनाका असावा.
टोलनाक्यावर अनेकदा ट्रॅफिक पाहायला मिळतं. पण हेच ट्रॅफिक टाळण्यासाठी फास्ट टॅग प्रणाली आणण्यात आली आहे. 1 डिसेंबर 2019 पासून फास्टटॅगचा वापर केला जाऊ लागला. टोल घेण्याची प्रक्रिया वेगात पार पडावी यासाठी ही प्रणाली आणली गेली. कॅशलेस व्यवहार हे या प्रणालीचं वैशिष्ट्ये आहे. यामुळे वेळ वाचतो आणि टोलनाक्यावर होणारं ट्रफिक टाळण्यास मदत होते.
टोल टॅक्समधून काही लोकांना सूट देण्यात आली आहे.देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, संरक्षण, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, विविध विभागांचे सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या सह अन्य लोकांना या टोल टॅक्समधून सूट देण्यात आली आहे.