देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या कारपैकी एक असलेल्या मारुती अल्टोचे (Maruti Alto) नवे मॉडेल लवकरच लाँच होणार आहे. कंपनीकडून यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. त्याचवेळी त्याचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये या कारचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात सर्वाधिक मार्केट शेअर एकट्या मारुती सुझुकीचे आहे. कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. त्यात, बलेनो, स्वीफ्ट, डिझायर, वेगनआरसह मारुती अल्टोचाही नंबर लागतो. सध्या अल्टो ही सर्वाधिक स्वस्त आणि जबरदस्त मायलेजमुळे (mileage) ग्राहकांच्या आकर्षणाचा केंदबिंदू ठरत आहे. आता तिची नवीन सिरीज येत असल्याने ग्राहकांमध्ये मोठी उत्सूकता आहे.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये नवीन मारुती अल्टो दिसत आहे. खरं तर ही जपानी मार्केटमध्ये रिव्हिल करण्यात आलेली Maruti Alto Kei आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या अल्टोपेक्षा ही पूर्णपणे वेगळी कार आहे. Alto Kei 660cc पेट्रोल इंजिनसह येते. त्याची रचना थोडी बॉक्सी आहे. भारतात विकली जाणारी अल्टो 796cc इंजिनसह येते.
मारुती सुझुकी इंडियाने 2022 मध्ये त्यांच्या अनेक वाहनांचे नवीन मॉडेल लाँच केले आहेत. यामध्ये सेलेरियो, बलेनो आणि वॅगनआरचा समावेश आहे. आता मारुती अल्टोची नवीन सिरीजदेखील लाँच करणार आहे. त्याचे प्रोडक्शन जूनमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि कंपनी 2022 च्या शेवटी ही गाडी बाजारात प्रत्यक्ष उतरवणार असल्याची चर्चा आहे.
एका रिपोर्टनुसार, नवीन अल्टोची रचना आणि आकार तसाच राहू शकतो, तर समोर नवीन ग्रिल आणि बंपर दिले जाऊ शकतात. त्यामुळे या वाहनाला नवा लूक मिळू शकतो. इतकंच नाही तर कंपनी नवीन अल्टोमध्ये 7 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो किंवा अॅपल कार प्ले सारखे पर्याय देऊ शकते. ही कार पॉवर विंडो, ड्युअल एअरबॅग तसेच सीएनजी पर्यायांसह देखील येऊ शकते. दरम्यान, कंपनीने नवीन मारुती अल्टोच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. असे असले तरी नवीन मारुती अल्टो लवकरच बाजारात येणार असल्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.