नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : पेट्रोल-डिझेलवरील निर्भरता कमी करण्याकडे सगळ्याच देशांनी सुरुवात केली आहे. पर्यायी इंधनासाठी सर्वच देश आग्रही आहेत. भारतात आता सध्या इलेक्ट्रिक वाहनांची घौडदौड सुरु आहे. तर केंद्र सरकारने इथेनॉलसाठी पुढाकार घेतला आहे. पुढील दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर वाढणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकीनंतर आता क्रम्प्रेस्ड नॅचरल गॅस(CNG) बाईकची चर्चा होत आहे. तर लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) बाईकची पण देशात लवकरच एंट्री होऊ शकते. हा प्रयोग इथेच थांबणार नाही. इथेनॉलसह इतर पर्यायी इंधनाचा पण विचार करण्यात येत आहे. या कंपनीने तर त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सीएनजी प्लॅटिना बाजारात
बजाज कंपनीने पर्यायी इंधनासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनी त्यासाठी अनेक पातळीवर प्रयोग करत आहे. ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, कंपनी देशात पहिली CNG Bike उतरविण्यासाठी सज्ज झाली आहे. देशातील पहिली सीएनजी प्लॅटिना लवकरच रस्त्यावर दिसू शकते. या बाईकचा कोड नेम E101 असे आहे. ही बाईक आता अंतिम टप्प्यात आहे. जर कुठलीही अडचण आली नाही तर बजाज सीएनजी प्लॅटिना येत्या सहा महिन्यात रस्त्यावरुन धावेल. या बाईकचे उत्पादन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार आहे.
तीनचाकीत कंपनीचा दबदबा
बजाज ऑटोचे ईडी, राकेश शर्मा यांच्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून कंपनीने देशात आयात आणि प्रदुषणाच्या आघाडीवर मोठे आव्हान पेलले आहे. तीनचाकी क्षेत्रात कंपनीचा मोठा वाटा आहे. आता या सेगमेंटमध्ये CNG आणि LPG ची सुरुवात करण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञान, आधुनिक क्षमता तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांआधारे कंपनीने या सेगमेंटमध्ये 90 टक्के वाटा उचलला आहे.
बजाज घेणार मोठी भरारी
कंपनीने दुचाकीमध्ये प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सेगमेंटचा विस्तार करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक बाईक, सीएनजी बाईकच नाही तर कंपनी एलपीजी, इथेनॉलवर पण लक्ष केंद्रीत करत आहे. या पर्यायामध्ये ग्राहकांसाठी नवीन मॉडेल आणण्यात येऊ शकतात. सीएनजी बाईक उत्पादनाचे लक्ष्य पण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनी जवळपास 1 ते 1.20 लाख वाहनांचे दरवर्षी उत्पादन करण्यावर भर देत आहे. भविष्यात ही क्षमता 2 लाख युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.