नवी दिल्ली | 6 February 2024 : देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या वाहनांना पर्याय मिळणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसोबत इतर अनेक पर्यायांवर सध्या संशोधन आणि प्रयोग सुरु आहे. पण फ्लेक्स फ्युएलचे वापर इतर देशात गेल्या काही दशकांपासून सुरु आहे. हाच पॅटर्न देशात राबविण्यात येणार आहे. केवळ चार चाकीच नाही तर दुचाकीसाठी पण फ्लेक्स फ्युएलचा पर्याय समोर आला आहे. मारुतीच्या व्हेगेनाआरसोबहतच रॉयल एनफिल्ड काल्सिक 350 पण या नवीन इंधनावर धावणार आहे. येत्या काळात अनेक कंपन्या फ्लेक्स फ्युएलवर चालणारी वाहनं आणतील असा अंदाज आहे.
काय आहे फ्लेक्स इंधन
आता फ्लेक्स फ्युएल या शब्दामुळे गोंधळून जावू नका. फ्लेक्स फ्युएलच्या मदतीने देश पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणार आहे. दररोज पेट्रोलचा होणार वापर कमी होणार आहे. सोप्या शब्दात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून फ्लेक्स इंधन तयार करण्यात येते. हे इंधन येत्या दिवसात E20, E50 मध्ये बदलेल. E20 मध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण असेल.
कसे तयार होते इथेनॉल
स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार होते. हे एक प्रकारचे अल्कोहोल असते. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते.
सर्वाधिक इथेनॉलचा वापर कुठे
जगात ब्राझीलमध्ये सर्वाधिक इथेनॉलचा वापर करण्यात येतो. फ्लेक्स फ्युएलचा तिथे वापर होतो. पेट्रोल-डिझेल यांना पर्याय म्हणून अनेक वर्षांपूर्वी इथेनॉलचा वापर सुरु झाला. जैविक इंधनावर या देशात जवळपास 93 टक्के वाहनं धावतात. इंजिनामध्ये त्यादृष्टीने बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या देशात पेट्रोल-डिझेलची आयात कमी होते.
असा वाचेल तुमचा पैसा
जिओ-बीपीने E-20 पेट्रोल तयार केले आहे. यामध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्या 96 रुपये आहे. त्यात 80 टक्के पेट्रोलची किंमत 76.80 रुपये तर इथेनॉलची किंमत सध्या 55 रुपये प्रति लिटर आहे. 20 टक्क्यांसाठी ही किंमत 11 रुपये होईल. या दोन्ही किंमती एकत्रित केल्या तर E-20 इंधनासाठी ग्राहकांना 87.20 रुपये प्रति लिटर मोजावे लागतील. सध्याच्या पेट्रोलपेक्षा ही किंमत प्रति लिटर 8.20 रुपयांनी स्वस्त आहे.