नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला कंपनी भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. काही वृत्तानुसार, टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कार उतरविण्याची योजनेला गती देत आहे. अमेरिकन बाजारातील इलेक्ट्रिक कारमध्ये टेस्लाचा (Tesla Electric Car) अनेक राज्यात मोठा वाटा आहे. त्यानंतर इतर कंपन्या आहेत. टेस्लाच्या चालकरहीत इलेक्ट्रिक कारची चाचणी पण काही राज्यांमध्ये सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या स्टेट व्हिजटसाठी गेले होते. त्यावेळी एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. मस्कने भारतीय बाजारात टेस्ला विक्रीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातंर्गत लवकरच टेस्ला भारतीय बाजारात दिसण्याची शक्यता आहे. सर्वकाही सुरळीत राहिल्यास इतक्या लाखात ही कार येईल. त्यामुळे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आतापासूनच हादरे बसायला सुरुवात झाली आहे.
काय आहे मस्कची योजना
मस्कची अनेक दिवसांपासून भारतीय बाजारावर नजर आहे. भारतीय बाजारात ऑटो सेक्टरमध्ये मोठी उलाढाल होत आहे. टेस्लाने भारतातील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासोबत चर्चेची योजना आखली आहे. तसेच सरकारकडून काही सवलती पदरात पाडून घेण्याची पण योजना आहे. टेस्ला चीननंतर भारतात इलेक्ट्रिक कारसाठी बेस स्टेशन तयार करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे इंडो-पॅसिफिक पट्यात त्यांना कार विक्री करता येईल.
उत्पादनाची तयारी
टाईम्स ऑफ इंडियातील एका रिपोर्टनुसार, टेस्लाने भारत सरकारपुढे महत्वकांक्षी योजना ठेवली आहे. या योजनेनुसार, टेस्ला भारतात उत्पादन सुरु करु शकते. त्यासाठी भारतात प्लँट सुरु करण्याची योजना आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन सुरु करुन त्याची आजूबाजूच्या देशात विक्री करण्याची योजना आहे.
टेस्लाच्या टीमकडून पाहाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांची नुकतीच भेट झाली. त्यात मस्क याने भारतात टेस्लाच्या पदार्पणाविषयी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मस्कने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅन असल्याचे वक्तव्य केले होते. त्यापूर्वीच टेस्लाची एक टीम भारतात येऊन व्यवसाय वाढीच्या दृष्टीने पाहाणी करुन गेली होती.
काय आहे योजना
टाईम्स ऑफ इंडियानुसार, टेस्ला भारतात जवळपास 5 लाख इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करण्याची योजना आखत आहे. टेस्लाची इलेक्ट्रिक कार 20 लाख रुपयांपासून भारतात विक्री होईल. जर ही योजना पूर्ण झाली तर भारतीय इलेक्ट्रिक बाजारात तीव्र स्पर्धा असेल. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि फीचर्ससह कार उपलब्ध होतील. टेस्लाच्या योजनेमुळे इलेक्ट्रिक बाजारात आतापासूनच हादरे जाणवत आहेत.