मुंबई: चारचाकी वाहन अर्थात कारच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये टोयोटाचा समावेश आवर्जून करावा लागेल. आजघडीला ही कंपनी जगात सर्वाधिक कार विकते. 2020 या वर्षात टोयोटाने (Toyoto) 95.28 चारचाकी गाड्या विकल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत टोयोटाची वाहनविक्री 11.3 टक्क्यांनी घसरली. तरीही कंपनीने वाहन विक्रीतील आपला अव्वल क्रमांक टिकवून ठेवला. तर याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीची Volkswagen कंपनी आहे. (Toyota car company success story and histroy)
प्रदीप ठाकुर यांनी टोयाटा कंपनीच्या प्रवासाविषयी एक पुस्तक लिहले आहे. यामध्ये सांगितले आहे की, 1 डिसेंबर 1923 साली जपानमध्ये मोठा भूकंप आला होता. त्या घटनेनंतर जपानी लोकांच्या मानसिकतेमध्ये आमुलाग्र बदल झाला. त्या भूकंपात अनेक जपानी लोकांनी कारमध्ये आसरा घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यामुळे नंतरच्य काळात लोकांनी कार खरेदीचा सपाटा लावला. परिणामी जपानमध्ये वाहननिर्मितीची बाजारपेठेत तेजीत आली.
टोयोटाचे संस्थापक किइचिरो यांनी 1933 मध्ये सर्वप्रथम हातमागाचे यंत्र तयार केले होते. मात्र, लहानपणापासूनच त्यांनी कार तयार करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. याच ध्यासातून त्यांनी प्रोटोटाईप मॉडेल AA1932 तयार केले. त्यांनी सुरुवातीच्या काळात कार असेब्लिंगचे काम केले. त्यानंतर त्यांनी 1936 मध्ये टोयोटा कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.
1951 साली टोयोटाने पहिल्यांदा लँड क्रुझर या जगप्रसिद्ध गाडीचे मॉडेल लाँच केले. तोपर्यंत टोयोटा कंपनीने महिन्याला 500 गाड्यांचे उत्पादन सुरु केले होते. या काळात किइचिरो यांनी वाहनांची गुणवत्ता आणि उत्पादन खर्च कमी ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे नंतरच्या काळात टोयोटा ही कंपनी नावारुपाला आली आणि कंपनीच्या गाड्यांचा खप वाढतच गेला.
सुरुवातीच्या काळात टोयोटा कंपनीने लष्करी ट्रक तयार करण्याचे काम हाती घेतले होते. 1945 साली दुसरे महायुद्ध झाले तेव्हा जपान पूर्णपण उद्ध्वस्त झाला होता. त्याच काळात टोयाटा कंपनी दिवाळखोरीत निघाली होती.
मात्र, किइचिरो यांनी बँकांशी बोलणी करुन टोयाटा कंपनी कशीबशी वाचवली. मात्र, बँकेने लादलेल्या अटींमुळे कंपनीला अनेक निर्बंध लागू करावे लागले. त्यामुळे टोयोटाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष उत्पन्न झाला आणि त्यांनी संप पुकारला. अखेर दोन महिन्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. त्यावेळी आइची यांनी टोयोटा मोटर्सची सूत्रे हाती घेतली.
आइची यांनी टोयाटो कंपनीला रुळावर आणण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. त्याच काळात जगाच्या काही भागांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले होते. त्यामळे अमेरिकेसह अन्य देशांकडून लष्करी ट्रक्ससाठीची मागणी वाढली.
या काळात आइची यांनी टोयाटाच्या संशोधन आणि विकास विभागाची स्थापना केली. तसेच जपानमध्ये अनेक ठिकाणी टोयाटाचे शोरूम सुरु केले. त्यामुळे टोयाटा कंपनीच्या नफ्यात भरघोस वाढ झाली.
1963 साली टोयाटाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्याकाळी कंपनीने तब्बल 10 लाख गाड्यांची निर्यात केली होती. 1991 साल उजडेपर्यंत टोयाटाने अमेरिकेत बाजारपेठेत जवळपास एक लाखापेक्षा अधिक ट्रक आणि कार विकल्या होत्या. याच काळात टोयाटाने लॅटिन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियातही आपला व्यवसाय सुरु केला.
तोपर्यंत टोयाटा केवळ किफायतशीर गाडी म्हणून ओळखली जायची. मात्र, त्यानंतर टोयोटाने लक्झरी कार्सच्या उत्पादनाला सुरुवात केली. 2000 साली टोयाटाने अनेक विदेशी कंपन्यांशी करार करून आपला नफा प्रचंड वाढवला. तर 2017 साली टोयाटाने रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या साहाय्याने कारनिर्मितीला प्रारंभ केला.
बाजारपेठीय मूल्यानुसार सध्याच्या घडीला टेस्ला ही जगातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. या कंपनीचे बाजारपेठेतील मूल्य 59.68 लाख कोटी इतके आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर टोयोटा कंपनी आहे. टोयोटाचे बाजारपेठीय मूल्य जवळपास 15.56 लाख कोटी इतके आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या Volkswagen चे बाजारपेठेतील एकूण मूल्य 7.25 लाख कोटी इतके आहे.
(Toyota car company success story and histroy)