मुंबई : कॅबने (Cab) प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली आणि वाईट अशी बातमी आहे. कॅबने प्रवास करताना अडचणींचा पाढा कमी होऊन तो सुखद ठरणार आहे. पण या सुखासाठी उबेरच्या ग्राहकांना सहन करावे लागतील भाडेवाढीचे चटके सहन करावे लागतील. तर तुमचा नेमका कोणता त्रागा कमी होणार ते पाहुयात, जर तुम्ही कॅब चालकाच्या वारंवार प्रवास रद्द (Ride Cancellation) करण्याच्या अडचणीमुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. चालकांच्या वारंवार प्रवास रद्द होण्याबाबत प्रवाशांच्या (Passengers) अडचणी दूर करण्यासाठी उबरने आपल्या अॅपमध्ये (App) असे काही बदल केले आहेत. यामुळे प्रवाशाला कोणत्या ठिकाणी जायचे आहे, याची संपूर्ण कल्पना कॅब बुक करताना, प्रवास सुरू करण्यापूर्वी चालकाला (Driver) कळू शकेल. जर ड्रायव्हरला त्या दिशेने जायचे नसेल तर तो राइड स्वीकारणार नाही, त्यामुळे तुमचा मनस्ताप वाचेल आणि त्याचा वेळ वाचेल. एकूण काय तर, ‘साब, किधर जाना हैं ? ‘ ही विचारण्याची नौबत येणार नाही.
खरं तर उबेर प्रवाशांची एक प्रमुख तक्रार अशी आहे की, प्रवास स्वीकारल्यानंतर चालक त्यांना फोन करून कुठे जायचं ते विचारतात आणि नमूद केलेलं ठिकाण त्यांच्या मनाप्रमाणे नसेल तर ते प्रवासाचा करार रद्द करतात किंवा कबूल केल्याप्रमाणे प्रवाशी घ्यायला येत नाहीत अथवा प्रवाशालाच प्रवासाची नियोजित फेरी रद्द करण्यास भाग पाडतात. यामुळे प्रवाशांची नाहक चिडचिड होते, कंपनीला आणि चालकाला शिव्या हासडून तो मोकळा होतो. पण आता तसे होणार नाही.
सध्या दिल्ली-एनसीआरसह देशातील 20 शहरांमध्ये हा बदल लागू करण्यात आला आहे. हळूहळू दुसऱ्या ठिकठिकाणी त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे. या बदलाच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी काही आठवडे उबेर, चालक आणि प्रवाशांच्या अभिप्रायावर बारकाईने लक्ष ठेवेल. तसेच लांब पल्ल्याच्या पिकअपवरील चालकांना अतिरिक्त कमाईचे साधन उपलब्ध करून देईल. खरं तर ड्रायव्हरला पिकअपसाठी दूर कुठेतरी जावं लागलं तर तो अनेकदा राइड रद्द करतो किंवा राइड स्वीकारूनही येत नाही. लांब पल्ल्याच्या पिकअपसाठी कंपनी आता ठरवून दिलेल्या भाड्याव्यतिरिक्त काही जादा पैसे चालकांना देणार आहे, असा तोडगा काढण्याचा निर्णय उबरने घेतला आहे.
ही रक्कम चालकाला मिळणाऱ्या भाड्याच्या पावतीतही स्वतंत्रपणे दाखविण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांना गर्दीच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी पिकअपसाठी दूरच्या ठिकाणी जाणेही अवघड होणार नाही. याशिवाय वाहनचालकांची गरज लक्षात घेऊन उबेर आता दैनंदिन वेतन प्रक्रियाही सुरू करणार आहे,ज्याअंतर्गत सोमवार ते गुरुवार प्रवासाचे पैसे दुसऱ्या दिवशी चालकांना मिळतील, तर शुक्रवार ते रविवार या प्रवासासाठीचे पैसे सोमवारी त्यांच्या खात्यात जमा होतील. यामुळे त्यांना देयकाची फार प्रतीक्षा करावी लागणार नाही.
इतक्या फीचर्सनंतर चालकांविरोधातील फेऱ्या रद्द करण्यासारख्या तक्रारी आल्यास त्याला दंड आकारला जाईल आणि तक्रारी अधिक आल्यास, त्याला प्रक्रियेतून हद्दपार करण्यात येईल.
देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. गव्हाचे पीठ, इंधन, फोन कॉलिंग या खर्चानंतर आता कॅबने प्रवास करणेही आपल्या खिशाला जड जाणार आहे. उबेरने अनेक शहरांमध्ये भाडेवाढ केली आहे. हा निर्णय तुमच्या खिशाला परवडणारा नसला तरी वाहनचालकांसाठी मात्र दिलासा आहे. इंधनाच्या वाढत्या दरांच्या विपरीत परिणामांमुळे चालकांचे उत्पन्न घटू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे खुद्द कंपनीनेच म्हटले आहे. भाडेवाढीमुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.